महापालिकेचा शिपाई बनला नगरसेवक !

February 22, 2012 11:56 AM0 commentsViews: 11

अजित मांढरे, मुंबई

22 फेब्रुवारी

मंुबई महानगरपालिका निवडणुकीत आरे कॉलनी प्रभाग क्रमांक 47 मधून शिवसेनेचे उमेदवार जितेंद्र वळवी निवडून आले आहेत. जितेंद्र वळवी मुंबई महानगरपालिकेत शिपाई पदावर काम करायचे. हा प्रभाग आदिवासींसाठी आरक्षित झाला आणि त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली. महापालिकेतला शिपाई ते नगरसेवक अशी मजल मारणार्‍या जितेंद्रवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

'नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे' सिनेमातला हा प्रसंग..एक शिपाई थेट मुख्यमंत्री बनतो तो हा प्रसंग..अर्थात या सगळ्या गोष्टी फक्त सिनेमातच घडतात अशा नाही, तर प्रत्यक्षातही घडतात ते अशा पद्धतीनं… मुंबई महापालिका कर्मचार्‍यांचा हा जल्लोष आहे. नगरसेवक जितेंद्र वळवीसाठी अर्थात कर्मचार्‍यांच्या लाडक्या जितूसाठी…..केवळ 8 महिन्यांपूर्वी महापालिकेत शिपायाची नोकरी, त्यानंतर थेट त्याच महापालिकेत नगरसेवकपदासाठी उमेदवारी आणि निवडणूक जिंकून नगरसेवकपदही. स्वप्न वाटावं अशी घटना पण ती खरी ठरलीय जितेंद्र वळवींच्या बाबतीत.

आरे कॉलनीतील आदिवासी पाड्यात राहणारा एका गरीब घरातील जितेंद्र हा तरुण…मंुबई महापालिकेत डिस्पॅच विभागात शिपाई म्हणून काम करत होता. शिवसेनेकडून त्याला आरे कॉलनी – प्रभाग क्रमांक 47 मधून उमेदवारी मिळाली आणि जितेंद्र निवडूनही आला. याआधी महापालिकेच्या या ऑफिसमधील कर्मचार्‍यांना, अधिकार्‍यांना आणि नगरसेवकांना फायलींबरोबर पाणी आणि चहा देण्याचे काम जितेंद्र वळवी करायचा, पण, आता कर्मचारीही तेच आहेत, अधिकारीही तेच आहेत फक्त बदललेत ते पाणी आणि चहाचे ग्लास देणारे हात, कारण जितेंद्र वळवी आता नगरसेवक झाला आहे.

जितेंद्रला आता त्याच्या आदिवासी बांधवांच्या विकासासाठी महापालिकेत काम करायचंय. सगळयात महत्त्वाचे म्हणजे ज्या पालिकेनं जितेंद्रला जिवाभावाचं मित्र मिळवून दिलं. त्या कर्मचार्‍यांना त्याला कधीच विसरता येणार नाही.

close