सैफला अटक आणि जामिनावर सुटका

February 22, 2012 4:14 PM0 commentsViews: 13

22 फेब्रुवारी

अभिनेता सैफ अली खानला आज मुंबई पोलिसांनी अटक केली आणि काही वेळातच 15 हजार रुपयांवर जामिनावर सुटकाही केली. सैफने कुलाब्यातल्या हॉटेल ताजमध्ये इक्बाल शर्मा नावाच्या व्यापार्‍याला मारहाण केली. या मारहाणीत इक्बालच्या नाकाला जबर मार लागला आहे. मारहाणीच्या वेळी सैफची गर्लफ्रेंड करीना कपूर आणि तिची बहीण करीश्मा कपूरही सैफच्या सोबत होत्या. या घटनेच्या वेळी हजर असलेल्या सगळ्यांनाच जबाबासाठी पोलीस बोलवण्याची शक्यता आहे. मी केवळ स्वतःचा बचाव केला, असा दावा सैफने केला.

आपल्या आगामी चित्रपटात, एजंट विनोदमध्ये पोलिसाच्या भूमिकेत असलेला सैफ अली खान गुन्हेगारांची चौकशी करताना आपल्याला बघायला मिळणार आहे. पण सध्या खरे खुरे पोलीस सैफची चौकशी करत आहे. मंगळवारी रात्री हॉटेल ताजच्या वसाबी या जापानिज रेस्टारेंटमध्ये सैफ अली खानने इक्बाल शर्मा या व्यपार्‍याला मारहाण केली. इक्बाल शर्मा हे मूळचे दक्षिण आफ्रिकेचे नागरिक आहेत. मंगळवारी रात्री इक्बाल शर्मा आपल्या कुटुंबीयांबरोबर वसाबीमध्ये जेवायला आले होते.

सैफ अली खान आणि त्याचे दोन मित्रही तिथे हजर होते. सैफ अली खानच्या टेबलवरुन खूप आवाज होत असल्याने इक्बाल शर्मा यांनी त्यांना आवाज कमी करण्याची विनंती केली. पण सैफला याचा राग आला. शांतता हवी असेल तर लायब्ररीत जाऊन बसण्याचा उपरोधात्मक सल्ला सैफने इक्बाल शर्मा यांना दिला. यानंतर झाली ती दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची. पण या बाचाबाचीचे रुपांतर मारामारीत व्हायला वेळ लागला नाही. या मारहाणीत इक्बाल शर्मांच्या नाकाचं हाड फ्रॅक्चर झालं आहे. या मारामारीदरम्यान सैफच्याबरोबर त्याची गर्लफ्रेंड करिना कपूर आणि तिची बहिण करिष्मा कपूरही हजर होती.

या प्रकरणी सैफ अली खानवर कलम 325 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चौकशीसाठी सैफच्या घरी पोलीस गेले असता सैफ मात्र त्याच्या वांद्र्याच्या घरी नव्हता. संध्याकाळी 9 च्या सुमारास सैफला मुंबई पोलिसांनी अटक केली आणि काही वेळातच 15 हजार रुपयांवर जामिनावर सुटकाही केली.

close