…तर राज्य सरकार बरखास्त का करू नये ?- काटजू

February 22, 2012 5:27 PM0 commentsViews: 16

22 फेब्रुवारी

प्रेस कौन्सिलच्या अध्यक्षांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना फटकारले आहे. महाराष्ट्रात पत्रकारांवर होत असलेले हल्ले थांबवता येत नाहीत तर सरकार बरखास्त का करू नये असा सवाल प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी मुख्यमत्र्यांना विचारला. महाराष्ट्रातल्या पत्रकारांच्या शिष्टमंडळाने आज काटजू यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रपतींचीही भेट घेतली. एस. एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली या भेटी झाल्या. महाराष्ट्रात पत्रकारांवर होणार्‍या हल्ल्यांसदर्भात त्यांनी चर्चा केली. त्यानंतर मार्कंडेय काटजू यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून खडे बोल सुनावले आहे.

काय म्हटलंय या पत्रात ?

श्री. पृथ्वीराज चव्हाणमुख्यमंत्री, महाराष्ट्र

महाराष्ट्रातल्या आठ पत्रकारांच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच माझी भेट घेतली. महाराष्ट्रात पत्रकारांवर वाढत्या हल्ल्यांविषयी त्यांनी मला माहिती दिली. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या इमारतीवर झालेल्या हल्ल्याविषयीही माहिती दिली. हा हल्ला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आहे. गेल्या 10 वर्षात 800 पत्रकारांवर हल्ला झाला तर गेल्या अडीच वर्षात 213 पत्रकारांवर राजकीय कार्यकर्त्यांनी किंवा समाजकंटकांनी हल्ला केल्याची माहिती मला मिळालीय. वरिष्ठ पत्रकार जे. डे यांची दिवसाढवळ्या झालेली हत्या तर अतिशय धक्कादायक आहे.

यासंदर्भात मी तुम्हाला दोन पत्रं लिहिली. पण तुमच्याकडून काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. मी तुमच्याकडून प्रतिसाद मिळण्याची अपेक्षाही ठेवू नये का? राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवणे हे राज्य सरकारचं काम आहे. पण तुमचं सरकार कायदा-सुव्यवस्था कायम ठेवू शकत नसल्याचं आणि पत्रकारांवरचे हल्लेही रोखू शकत नसल्याचं दिसतंय. हे माध्यम स्वातंत्र्यासाठी धोकादायक आहे. तुमचं राज्य सरकार माध्यम स्वातंत्र्य कायम राखण्यात अयशस्वी ठरलंय. त्यामुळे घटनेच्या कलम 356 अंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकार बरखास्त करावे अशी शिफारस राष्ट्रपतींना का करण्यात येऊ नये? यावर येत्या 3 दिवसात तुमची प्रतिक्रिया कळवावी, त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.

आपला विश्वासूमार्कंडेय काटजू

close