समलिंगी संबंधांवर गृहमंत्रालयाचा घोळ

February 23, 2012 9:35 AM0 commentsViews: 35

23 फेब्रुवारी

समलिंगी संबंध म्हणजे गुन्हा आहे का या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्रालयाने आज सुप्रीम कोर्टात घोळ घातला. त्यावेळी ऍडिशनल सॉलिसिटर जनरलनी गृहमंत्रालयाचं जुनं प्रतिज्ञापत्र कोर्टात वाचून दाखवलं. या प्रतिज्ञापत्रात समलिंगी संबंध हे अनैतिक आणि समाजविरोधी असल्याचे गृहमंत्रालयानं म्हटलं होतं. या घोळानंतर समलिंगी संबंधांच्या मुद्द्यावर आपण अजून कोणतीही भूमिका घेतली नसल्याचे गृहमंत्रालयाने म्हटलं आहे.

समलिंगी संबंधाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्रालयाचा घोळ गुरुवारी सुप्रीम कोर्टात उघड झाला. समलिंगी संबंधांना विरोध करणारे प्रतिज्ञापत्र ऍडिशनल सॉलिसिटर जनरल पी. पी. मल्होत्रा यांनी सुप्रीम कोर्टात वाचून दाखवलं. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी म्हटलं..

'समलिंगी संबंध हे अनैतिक आणि समाजविरोधी आहेत. अशा संबंधांमुळे रोगप्रसार होण्याची शक्यता आहे. शिवाय आपली नैतिक आणि सामाजिक मूल्यं इतर देशांपेक्षा वेगळी आहेत. त्यामुळे आपल्याला अशा संबंधांना मान्यता देता येणार नाही.'

ही बातमी वा-यासारखी पसरली. आणि चहूबाजूंनी सरकारवर टीकेची झोड उठताच सरकारने सारवासारव केली. आणि मल्होत्रा यांनी जुनं प्रतिज्ञापत्र वाचून दाखवल्याचं गृहमंत्रालयातल्या सुत्रांनी सांगितलं. समलिंगी संबंधांच्या मुद्द्यावर आपली भूमिका अजून ठरवलीच नसल्याचे गृहमंत्रालयाने म्हटलं आहे. या पूर्ण घोळावर समलिंगी संघटनांनी रोष व्यक्त केला.

आयपीसीतल्या 377 व्या कलमानुसार समलिंगी संबंध हा गुन्हा ठरवण्यात आला. पण 2009 मध्ये दिल्ली हायकोर्टाने परस्पर संमतीने ठेवलेले समलिंगी संबंध म्हणजे गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल दिला होता. त्याविरोधात अनेक धार्मिक संघटनांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण केंद्र सरकारची याबाबतची भूमिका मात्र अजूनही स्पष्ट झालेली नाही.

close