अणुऊर्जा प्रकल्पविरोधावरुन संघर्ष चिघळला

February 25, 2012 4:44 PM0 commentsViews: 5

25 फेब्रुवारी

अणुऊर्जा प्रकल्पविरोधी आंदोलनाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान कार्यालय आणि सेवाभावी संस्था(NGO) यांच्यातला लढा आता तीव्र झाला आहे. दोन्ही बाजू एकमेकांविरोधात बदनामीचा खटला दाखल करण्याच्या तयारीत आहेत. अणुऊर्जा प्रकल्पविरोधी आंदोलनातील कार्यकर्ते उदयकुमार यांना पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री नारायणसामींनी पत्र लिहिलं आहे. आणि स्वीडनच्या निधीवर चालणार्‍या आयडिया या एनजीओ शी असणार्‍या संबंधांचं स्पष्टीकरण मागवलंय. त्यावर आपण केवळ या NGO च्या तज्ज्ञ समितीचा भाग असल्याचं उदयकुमार यांनी म्हटलंय.

पंतप्रधान कार्यालयाविरोधात बदनामीचा खटला दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे. तामिळनाडूतल्या कुडनकुलममधल्या अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणार्‍या एनजीओना अमेरिकेतून निधी मिळतो, असा आरोप खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग यांंनी केला होता. त्यावरून हा सर्व वाद सुरू झाला आहे. त्यावर भारतातल्या अणुऊर्जा प्रकल्पांना अमेरिकेचा विरोध नसल्याचे अमेरिकेचे भारतातील राजदूत पीटर बर्लिग यांनी स्पष्ट केलं आहे. पण रशियाने मात्र पंतप्रधानांच्या वक्तव्याचं स्वागत केलं आहे.

कुडनकुलमचा प्रकल्प रशियाच्या मदतीनं सुरू होतोय. दरम्यान, पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेलं वक्तव्य योग्य असल्याचं ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान स्वत: असं जाहीररित्या बोलत असतील तर त्यांच्याकडे तसा ठोस पुराव आहे म्हणूनच ते बोलत आहेत. देशात निर्माण होणार्‍या अणुवीज प्रकल्पांना विरोध करण्यासाठी अँन्टी न्युक्लिअर लॉबी सक्रीय आहे. ही लॉबी विदेशातून आर्थिक पाठबळ घेऊन देशाच्या विकासात अडथळे निर्माण करत आहे. असं मत काकोडकरांनी आयबीएन लोकमतकडे व्यक्त केलं.

close