दारुबंदी टाळण्यासाठी पोलीस,विक्रेत्यांचा एकच प्याला !

February 26, 2012 2:15 PM0 commentsViews: 7

माधव सावरगावे,औरंगाबाद

26 फेब्रुवारी

औरंगाबाद जिल्हयातील वाघोळा गावच्या ग्रामस्थांनी गेल्या 7 वर्षांपासून दारु बंदीसाठी लढा उभारला आहे. पण हा लढा पोलीस आणि सरकारी यंत्रणेच्या कृपादृष्टीमुळं पुढेचं जात नाही. अख्ख गाव विरोध करतयं पण पोलीस दारुविक्रेत्याला साथ देत आहे. त्यामुळे वाघोळा गावावर सध्या अवकळा पसरली आहे.

वाघोळा गावातील गावकर्‍यांनी आता शेवटच्या लढ्याची हाक दिली. त्यांची मागणी फक्त एकच आहे. गावातली दारू बंद करा. स्थानिक पोलीस स्टेशन ते मंत्रालयापर्यंत सर्वांकडे दाद मागून झाली. मात्र दारू तर बंद झाली नाहीच, उलट दारूबंदीसाठी पुढाकार घेणार्‍या तरूणांंनाच दारू विक्रेत्याकडून त्रास दिला जातोय.

वाघोळयातल्या ग्रामस्थांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून प्रेरणा घेतली आहे. याच गावातील स्वर्गीय शेषराव पाटील गायकवाड यांनी गावाला व्यसनमुक्त ठेवलं. पण त्यांच्यानंतर गावात दारुचा अड्डाचं बनला आणि गावाची अर्थव्यवस्थाच कोलवडून पडली. याची सर्वात जास्त झळ बसली ती महिलांना.

तंटामुक्त अभियानामार्फतही दारूबंदीसाठी प्रयत्न झाले आहे. पण दारूविक्रीला पोलिसांचंच अभय असल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत पण पुन्हा तपासणी करू असं सांगत पोलीस सारवासारव करत आहे. सात वर्षापासून लढाई लढूनही यश मिळत नसल्याने आता गावकर्‍यांनी दारूबंदीसाठी आता आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. आदर्श गाव बनवण्यासाठी गावकर्‍यांना गरज आहे ती फक्त सरकारच्या थोड्या मदतीची.

close