कापसाच्या निर्यातीवर बंदी

March 5, 2012 9:07 AM0 commentsViews: 8

05 मार्च

केंद्र सरकारनं कापसाच्या निर्यातीवर पुन्हा एकदा बंदी घातली. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संतापले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात ठिकठिकाणी शेतकर्‍यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकरी नेत्यांनीही निर्यातबंदीचा निषेध केला.

कापसाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे कारण केंद्र सरकारने कापसाच्या निर्यातीवर बंदी घातली. देशातल्या कापडनिर्मितीसाठी कापूस कमी पडेल, या कारणासाठी टेक्स्टाईल मिल्सनी ही मागणी केली होती. कापसाच्या 80 लाख गाठींसाठी 2011-12 या वर्षात निर्यातीची परवानगी होती. पण प्रत्यक्षात 85 लाख गाठी निर्यात झाल्यात. निर्यातीची मर्यादा ओलांडल्यामुळे सरकारने बंदी घातलीय. शेतकर्‍यांनी आणि शेतकरी नेत्यांनी या बंदीचा निषेध केला.

कापूस निर्यातबंदीच्या निर्णयामुळे राज्यातले कापूस उत्पादक संतापले आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि परभणीत शेतकरी रस्त्यावर उतरले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं परभणीत केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याची जाळपोळ केली. वर्धा जिल्ह्यातल्या देवळीत शेतकरी आणि व्यापार्‍यांनी रास्ता रोको केला.

19 मार्चला पुण्याच्या कृषी आयुक्त कार्यालयावर विदर्भ, मराठवाडा, खान्देशातले कापूस उत्पादक शेतकरी मोर्चा नेणार आहेत. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही हमीभावावरून कापसाचा प्रश्न पेटला होता. आता पुन्हा एकदा कापूस उत्पादक रस्त्यावर उतरले आहे.

close