पंजाबमध्ये पुन्हा अकाली दल-भाजपचीच सत्ता

March 6, 2012 5:56 AM0 commentsViews: 3

06 फेब्रुवारी

पंजाबनं आज इतिहास घडवला. पंजाबच्या जनतेने पुन्हा एकदा चंदीगडचं तख्त शिरोमणी अकाली दलाकडे सोपवलं. पाच राज्यांच्या आजच्या निकालातील सगळ्यात धक्कादायक अशी ही घटना आहे. पंजाबमध्ये कुठल्याच पक्षाला सतत दोनदा जनादेश मिळणं असं कधीच झालं नव्हतं. पण, यावेळी 84 वर्षांच्या प्रकाशसिंग बादल यांच्या सरकारवर पंजाबने पुन्हा एकदा विश्वास दाखवला. 1957 मध्ये पंजाब विधानसभेत एन्ट्री केलेल्या बादल यांनी आज 2012 मध्ये म्हणजे तब्बल 55 वर्षांनंतरही आपणच पंजाबचे किंग असल्याचं दाखवून दिलं आहे.

खरंतर, भ्रष्टाचाराचे भयंकर आरोप झालेल्या शिरोमणी अकाली दलाला जनता घरचा रस्ता दाखवेल असंच म्हटलं जात होतं. पण, अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केलेला प्रचार अकाली दलाच्या कामी आला. शिवाय…

* या सरकारने दारिद्र्यरेषेखालच्या कुटुंबासाठी सुरू केलेली आटा दाल योजनाआणि * प्रकाश सिंग बादल यांची अखेरची निवडणूक असा केला गेलेला भावनात्मक प्रचार

हे दोन मुद्देही महत्त्वाचे ठरले. शिवाय, काँग्रेसमध्ये जवळपास 24 जागांवर झालेली बंडखोरीही अकाली दलाच्या पथ्यावर पडली. काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपला पराभव अखेर मान्य केला.

बादल यांच्या घरात निवडणुकीआधी फूटही पडली होती. मनप्रीत बादलने नवा पक्ष काढला होता. पण, पंजाबच्या जनतेने मनप्रीतलाही काँग्रेससोबत नाकारलंय. पण, महत्त्वाचा मुद्दा आणखी वेगळा आहे. मिळवलेली सत्ता पुढच्या निवडणुकीत टिकवताही येते, हा अत्यंत महत्त्वाचा संदेश पंजाबच्या राजकारण्यांना या निवडणुकीने दिला.

close