ठाण्यात सत्तेचे नवे रंग !

March 7, 2012 1:00 PM0 commentsViews: 10

07 मार्च

रंगांची बेधुंद उधळण करणारा होळी उत्सव उद्यावर येऊन ठेपला आहे. पण दोन दिवसाअगोदरच नव्यारंगात राज्याचे राजकारण रंगून गेले आहे. राजकारणाच्या पटलावर मनसेनं ठाण्यात युतीला दिलेल्या पाठिंब्यामुळे नवा रंग उधळला गेलाय. आज पुन्हा एकदा ठाणे जिल्हा परिषदेतही मनसेने युतीला पाठिंबा जाहीर केला आहे. मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार रमेश पाटील यांनी याबाबत माहिती दिली. गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता आहे.

पण, यावेळी ठाणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 26, काँग्रेसचा 1, शिवसेनेचे 15, भाजपचे 11, माकप 4, हितेंद्र ठाकूर आणि विवेक पंडित यांचे प्रत्येकी 3- 3, मनसेचे 2 आणि एक अपक्ष असे एकूण 66 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले आहेत. जिल्हा परिषदेवर सत्ता आणण्यासाठी 34 आकडा गाठणं गरजेचं आहे. तो आपण मिळवू असं युतीच्या नेत्यांना वाटतंय. मनसेच्या पाठिंब्यामुळे महायुतीचा आकडा 28 होतो तिकडे आघाडीचा 28 आकडा अगोदरच गाठला आहे. आता युतीला आणि आघाडीला 6 जागांसाठी वाटाघाटी करायची आहे. पण डाव कोण जिंकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मनसेच्या पाठिंब्यानंतर उध्दव ठाकरे यांनीही आपले गणित बदलले आहे. राज ठाकरे यांना नाशिकमध्ये सत्तास्थापन करण्यासाठी शिवसेनेचा पाठिंबा लागला तर आम्ही देऊ अशा शब्दात शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी सेनेकडून एक पाऊल पुढे टाकले आहे. ठाण्यातला महापौर निवडीदरम्यान, मनसे आणि शिवसेना- भाजप युती पहिल्यांदा एकत्र आली. त्यानंतर राज्यात जिल्हा परिषद आणि इतर काही महापालिकांमध्ये हा ठाणे पॅटर्न कसा जुळतो, याची चर्चा सुरु झाली आहे. ठाण्यातल्या राजकीय बदलानंतर आता नाशिक महापालिका, औरंगाबाद जिल्हा परिषद आणि ठाणे जिल्हा परिषदेतल्या सत्ता समीकरणांची चर्चा सुरु झाली आहे.

नाशिकमध्ये शिवसेनेनं भाजपला महापौरपदाचा उमेदवार उभा करण्यास सांगितलं होतं. पण इथं भाजपनं त्यांचा उमेदवारच उभा केला नाही, त्यामुळे आता ऐनवेळेस शिवसेनेनं त्यांचा उमेदवार उभा करण्याचं ठरवलं आहे. ठाण्यातल्या समीकरणानंतर उद्धव ठाकरेंनीही मनसेनं सांगितलं तर आम्ही नाशिकबाबत त्यांचा विचार करु असे संकेत दिले आहे. त्यामुळे भविष्यात ठाकरे अधिक ठाकरे हे सत्तेतलं समीकरण तयार झालं, तर निश्चितपणे काँग्रेसला राष्ट्रवादीला त्याची झळ सोसावी लागणार आहे.

तर तिकडे मराठवाड्याच्या राजधानी औरंगाबादमध्येही आशा पल्लवित झाल्या आहेत. ठाणे पॅटर्न सारखा औरंगाबादमध्ये सकारात्मक निर्णय झाला तर युतीची सत्ता जिल्हा परिषदमध्येही येईल असं स्थानिक युतीच्या नेत्यांना वाटतंय. तरी यासंदर्भात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेच निर्णय घेणार असल्याचं शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप युतीने 23 जागा मिळवल्यात तर काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीने 26 जागा मिळवल्या आहेत. बहुमतासाठी 31 जागांची गरज आहे. मनसेला या निवडणुकीत 8 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे मनसे ही किंगमेकर ठरली आहे. आता काय राजकीय घडामोडी घडतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

close