पुण्याला ‘स्वच्छ’ करणार्‍या महिलांची वाट न्यारी !

March 8, 2012 12:33 PM0 commentsViews: 2

प्राची कुलकर्णी, पुणे

08 मार्च

'स्वच्छ पुणे, सुंदर पुणे'चं स्वप्न राजकारण्यांनी पुणेकरांना तर दाखवलं. पण हे पुणे स्वच्छ करण्यासाठी धडपडणार्‍या कष्टकरी महिलांना मात्र कधी नागरिकांच्या तर कधी पोलिसांच्या त्रासालाच सामोरं जावं लागत होतं. पुण्यातल्या लक्ष्मी नारायण यांनी या सगळ्या महिलांना संघटित केलं. आणि सुरुवात झाली स्वच्छ या संस्थेला.

पुण्याच्या वैदुवाडीमधल्या या कचरावेचक महिला..आज दुपारी निवांत गप्पा मारत त्यांची बैठक सुरु आहे. पूर्वी मात्र हे चित्र असं नव्हतं.

मंगल कांबळे म्हणतात, रोजच आयुष्य हे ठरलेलं असायचं. पाठीवर पोतं घेऊन फिरायचो, कुत्री मागे लागायची, लोक बोलायचे.दिवसदिवस कचरा वेचत फिरायचे. कष्ट तर होतेच पण त्यासोबत त्रासही होता. 'पुर्वी कुठे चोरी झाली असेल आणि आम्ही तिथून चाललो असू तर पोलीस डायरेक्ट आत टाकायचे' अशी व्यथा मांडली मनिषा भंडारी यांनी.

एसएनडीटी कॉलेज मध्ये काम करणारी एक प्राध्यापिका हे पहात होती. त्यांच्याबरोबर काम करताना या कचरावेचक महिलांना संघटित कऱण्याची गरज तिला जावणत होती. ही महिला होती स्वच्छ संस्थेची सुरुवात कऱणारी लक्ष्मी नारायण.

लक्ष्मी नारायण म्हणतात, कुठेतरी त्यांना संघटित करायची गरज होती. महापालिकेला आम्ही विचारलं या महिला तुमच्या साठीच काम करतायत. त्यांच्यासाठी तुम्ही काय करता.

आता कंचर्‍यामधून भंगार वेचायचं काम तर थांबलंय. त्यापुढे जाऊन या महिला पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये घरोघरी कचरा गोळा करतायत. इतकंच नाही तर पिंपरी मध्ये जे छोटे ट्रक दिले आहेत ते चालवण्याचं काम या महिलाच करत आहेत. अर्थात अजूनही परिस्थिती पूर्ण बदलली नसल्याचंच लक्ष्मी सांगते. महिन्याला दहा वीस रुपये द्यायचं ठरलेलं असतं तरी ते प्रॉब्लेम करतात. सुट्टे नाहीत म्हणतात. लक्ष्मी यांचं स्वप्न आज साकार होतंय. आणि म्हणूनच कदाचित या कचरावेचक महिला आज म्हणू शकतात. शेवटी मंगल कांबळे अभिमानेने म्हणतात, मी नोकरी करते.. जॉब करते आहे.. इतर लोकांसारखा..

close