आयपीएस अधिकारी नरेंद्रकुमार यांच्यावर अंत्यसंस्कार

March 9, 2012 5:37 PM0 commentsViews: 7

09 मार्च

आयपीएस अधिकारी नरेंद्र कुमार यांच्यावर आज शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मध्यप्रदेशातील खाण माफियांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न नरेंद्र कुमार करत होते. मोरेना जिल्ह्यात खाणीतून अवैध दगड घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरला थांबवण्याचा प्रयत्न करताना ट्रॅक्टरने त्यांना चिरडलं .यावेळी नरेंद्र कुमार यांचा जागच्याजागी मृत्यू झाला. मात्र मायनिंग माफियांकडून ही हत्या झाल्याचा आरोप होतोय. याप्रकरणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी न्यायालयीन चौकशीचे आदेशही दिलेत. पण पोलिसांनी मात्र या हत्येत मायनिंग माफियांचा हात असल्याचं वृत्त फेटाळले आहे

30 वर्षांचे आयपीएस अधिकारी नरेंद्र कुमार यांच्या पार्थिवावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. बेकायदेशीर खाणकाम करणार्‍या टॅक्टरखाली चिरडून त्यांना ठार मारण्यात आल्याचा आरोप होतोय. मध्य प्रदेशातल्या मोरेनामध्ये सुरु असलेल्या अवैध खाणकामाविरोधात नरेंद्र कुमार यांनी धडक कारवाई सुरु केली होती. त्याची किंमत त्यांना आपला जीव गमावून चुकवावी लागली. याप्रकरणात ट्रक ड्रायव्हरला अटक झालीय. पण नरेंद्र कुमार यांच्या मृत्यूमागे मायनिंग माफिया नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

चंबल रेंजचे डीआयजी डी. पी. गुप्ता म्हणतात, या प्रकरणात आरोपी व्ययक्तिक कामासाठी दगड घेऊन जात होता. नरेंद्र यांच्या मृत्यूमागे माफियांचा हात असल्याचे पुरावे अजूनतरी मिळालेले नाही.

नरेंद्र कुमार यांच्या हत्येवरुन विरोधी पक्ष काँग्रेसनं मध्य प्रदेश सरकारवर टीकेची झोड उठवलीय. तर मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाणांनी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहे.

दिग्विजय सिंग म्हणतात, अवैध खाणकामामध्ये मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय, आमदार आणि खासदार असल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत.

निडर आणि कर्तव्यदक्ष अशी नरेंद्र कुमार यांची ओळख होती. मायनिंग माफियांविरोधात त्यांनी कारवाईही सुरु केली. पण त्यांच्या हत्या प्रकरणात मायनिंग माफियांना क्लीन चीट देण्यात पोलीस अधिकार्‍यांनी जी तत्परता दाखवली, त्यावरुन आता बरेच प्रश्न निर्माण झालेत.

close