सुदामनं पटकावलं राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक

November 22, 2008 11:46 AM0 commentsViews: 1

22 नोव्हेंबर हिंगोलीसंतोष पवारकोणत्याही सोयी-सुविधा नसताना हिंगोलीमधल्या कळमनुरी तालुक्यातल्या एका अंध तरुणानं पराक्रम गाजवला. सुकळी वीर गावातील या आदिवासी मुलानं जळगाव इथे झालेल्या अंधांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत जलतरणामध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. सुदाम पोटे हा जन्मापासूनचं 75 टक्के अंध. आई-वडील शेतमजूर, घरची हलाखीची परिस्थिती. क्रीडा क्षेत्रात आवश्यक असलेल्या सोयीसुविधापासून वंचित. कोणाची आर्थिक मदत नाही.पोहायची आवड आणि तोच ध्यास असल्याकारणामुळे अपार मेहनत करण्याची क्षमता.पोहाण्याच्या सरावासाठी गावातलं तळं. अंगी असलेली जिद्द आणि मेहनत या जोरावर त्यानं सुवर्णपदक मिळवण्याचा पराक्रम केला आहे. सध्या नववीत शिकणा-या सुदामला लहानपणापासूनचं पोहण्याची आवड होती. केवळ जिद्दीच्या जोरावरच सुदामनं जळगावातल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत जलतरणातल्या फ्री स्टाईलमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. ग्रामीण भागात असल्यानं त्याला योग्य प्रशिक्षण मिळतं नाही. त्यामुळे पुढील वाटचालीसाठी त्याला अडचणी येत आहेत असं सुदामचे शिक्षक श्री बेंद्रे सांगतात. अंध असूनही अशी कामगिरी करणारा सुदाम तालुक्यातील पहिला खेळाडू ठरला आहे. त्यांच्या समाजात तोच सर्वात जास्त शिकला आहे. आता पुढचा प्रवास त्याला आत्मविश्वासानं साकारायचा आहे. तिमीरातून तेजाकडे…

close