कोकणातील बंदरांना हवी रेल्वेमार्गाची साथ !

March 12, 2012 6:13 PM0 commentsViews: 28

दिनेश केळुसकर, रत्नागिरी

12 मार्च

कोकणच्या औद्योगिक विकासासाठी रेल्वे बजेटमधून कोकण रेल्वेला अधिक पायाभूत सुविधा मिळाव्यात अशी अपेक्षा कोकणावासियांकडून व्यक्त होतेय. कोकणातील विकसनशील बंदरं रेल्वेमार्गाने भारताशी जोडण्यासंबंधी या रेल्वे बजेटमध्ये नियोजन व्हावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कोकण रेल्वे कृती समितीचे निमंत्रक ऍड. विलास पठाणे म्हणतात, जेव्हा सहा मोठी बंदरं फुल प्लेज कार्यान्वित होतील तेव्हा 5 ते 6 हजार कोटींची इन्व्हेस्टमेंट होईल. आज कोकणातला आंबा, काजु, मच्छी हा सगळा व्यापार उदीम हा बंदर आणि कोकण किनारपट्टीवर चालतो म्हणून बंदरं आणि कोकण रेल्वे यांची जर कनेक्टीव्हीटी वाढली तर जलद वाहतूक होईल आणी तेच गरजेचं आहे. जसं दिघी इंदापूर झालं तस भोके जयगड आणी नांदगाव ते विजयदूर्ग अशे जर मार्ग झाले तर कोकणात औद्योगिक क्रांती होईल.

निसर्गाच्या तडाख्यात दरवर्षी फसणार्‍या कोकण रेल्वेचा खर्च प्रवासी वाहतुकीतून भागत नाही. त्यामुळे कोकण रेल्वेला वाहतुकीसाठीही एकच मार्ग वापरावा लागतो. गेल्या चौदा वर्षात कोकण रेल्वेचा फ़ायदा हा कोकणातल्या आणि भारतातल्या प्रवाशांना झालेला आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळात कोकणचा खर्‍या अर्थाने औद्योगिक विकास व्हायचा असेल तर कोकण रेल्वेचे मार्ग भारतीय रेल्वेशी जोडले गेले पाहिजेत आणी त्या दृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी दुपदरीकरण आणी ट्रमिनस सारखी व्यवस्था उभी रहायला पाहिजे.

ऍड. विलास पठाणे म्हणतात, पनवेल ते रोहा हे शंभर किलोमीटरचं अंतर खूप मंदगतीने चाललंय. रोहा ते वीर हे 42 किलोमीटरचे अंतर अजूनही सर्व्हेक्षणाच्या स्तरावर आहे.दुसरं वैभववाडी ते वेर्णा हा 222 किलोमीटरचा ट्रॅक तातडीने दुपदरीकरण होण्याची गरज आहे. त्या दृष्टीने ह्या बजेटमध्ये तरतूद होणं अत्यंत गरजेचं आहे.

महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या कोकण रेल्वेचा केंद्रीय अर्थसंकल्पाशी तसा थेट संबंध नसला तरीही देशातल्या एकूण ग्रामीण विकासाच्या धोरणात कोकण रेल्वेचा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने रेल्वे बजेटमध्ये कोकण रेल्वेचा विचार होईल अशी अपेक्षा कोकणातल्या उद्योजक आणि लोकांना आहे.

close