नाशिकमध्ये कमळाची इंजिनला साथ ?

March 13, 2012 5:36 PM0 commentsViews: 8

13 मार्च

नाशिकमध्ये अखेर मनसेचाच महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नाशिकमध्ये महापौरपदासाठी भाजप मनसेला पाठिंबा देण्याच तयारीत आहे. यासंदर्भात सोमवारी दुपारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांची मुंबईत भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नाशिकमध्ये भाजप मनसेला पाठिंबा देईल आणि शिवसेना तटस्थ राहू शकते, अशी चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सुधीर मुनगंटीवार शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंची भेट घेऊन याबाबत युतीची रणनीती ठरवणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलंय. दरम्यान, भाजपच्या नाशिकमधल्या स्थानिक पदाधिकार्‍यांना मुनगंटीवार यांनी चर्चेसाठी बोलावून घेतलं आहे. हे पदाधिकारी मुंबईला यायला निघालेत. आज रात्रीच मुनगंटीवार त्यांना भेटण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, सावधगिरीचे उपाय म्हणून भाजपने आपल्या 14 नगरसेवकांना लोणावळ्यात ठेवलं आहे. मनसेनं ठाण्यात युतीला पाठिंबा दिला होता, तर मुंबईत तटस्थ भूमिका घेतली होती. त्यामुळे शिवसेना नाशिकमध्ये तटस्थ राहू शकते. तसं झाल्यास नाशिकमध्ये मनसेचा महापौर आणि भाजपचा उपमहापौर होऊ शकतो. तसेच 2014 च्या निवडणुकीत गरज भासल्यास मनसे आपल्या बाजूने असावी, असं भाजपला वाटतंय. त्यामुळेच भाजपनं नाशिकमध्ये मनसेला पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेतल्याचं समजतंय.

close