त्रिवेदींना हटवण्यासाठी ममतांचे पंतप्रधानांना पत्र

March 14, 2012 5:18 PM0 commentsViews: 1

14 मार्च

तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनजीर्ंनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना एक फॅक्स पाठवून रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदींना हटवण्याची मागणी केली आहे. दिनेश त्रिवेदी यांच्याऐवजी तृणमूलचे खासदार मुकुल रॉय यांच्या नावाची शिफारसही त्यांनी या फॅक्समध्ये केल्याचं समजतयं. त्यामुळे दिनेश त्रिवेदींना आता आपलं रेल्वे मंत्रालय सोडावं लागणार आहे हे निश्चित झालं आहे.

आज 2012-13 चं रेल्वे बजेट सादर झालं.आणि विरोधकांआधीच तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी त्रिवेदींना लक्ष्य केलं. ममता बॅनजीर्ंनी त्रिवेदींना बोलावून घेतलं. तृणमूलचे खासदार पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटून रेल्वेमंत्री पदासाठी दुसरं नाव सुचवणार होते पण संतापलेल्या ममतादीदींनी अगोदरच फॅक्स पाठवून त्रिवेदींचा पत्ता कट केला आहे.

रेल्वेच्या भल्यासाठी भाडेवाढ, 'आता भाडेवाढ मागे नाही' असं सांगणार्‍या तृणमूल काँग्रेसचे नेते असलेल्या रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांचं पहिलं रेल्वे बजेट.बजेटनंतर लगेच त्रिवेदींना सामना करावा लागला तो पक्षांतर्गत इशार्‍याचा आणि दबावाचा कारण होतं. त्यांनी केलेली रेल्वे भाड्यातली दरवाढ. त्रिवेदी यांनी दरवाढ करण्यापूर्वी पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्याशी कुठलीही चर्चा केली नाही, म्हणून ममतादीदी नाराज झाल्या आणि संतापलेल्या ममतादीदींनी दरवाढ मागे घ्या नाहीतर पद सोडा अशा इशाराच त्यांना दिला. पण एवढं होऊनही त्रिवेदी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

पश्चिम बंगालमध्ये डाव्यांना धूळ चारुन ममतादीदी सत्तेत आल्या आणि सर्वसामान्यांचा नेत्या असा लौकिक मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. तशातच त्यांच्याच पक्षाच्या रेल्वेमंत्र्यांना सर्वसामान्यांच्या खिशालाच कात्री लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कदाचित बंगालमध्ये डावे जनतेला हाताशी धरुन दीदींच्या विरोधात रान पेटवू शकतात, याची भीती ममतादीदींना आहे. म्हणून त्यांनी त्रिवेदींच्याबाबतीत इशार्‍याची भाषा वापरली.

दिनेश त्रिवेदी यांची गच्छंती होण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या जागी नव्या नेत्यांचं नाव देण्याची तयारीदेखील तृणमुल काँग्रेसने सुरु केली. दरम्यान, ही भाडेवाढ मागे घेण्याची विनंती करण्यासाठी तृणमूलचे खासदार पंतप्रधानांचीही भेट घेणार आहेत. पण त्या अगोदरच ममतादीदींनी उचलेल्या पाऊलामुळे अगोदर दिनेश त्रिवेदींची उचलबांगडी केली जाणार आहे.

close