मुंबईच्या वाट्याला काय मिळाले ?

March 14, 2012 8:52 AM0 commentsViews: 6

14 मार्च

लोकलच्या गर्दीत गुदमरणार्‍या मुंबईकरांना रेल्वे बजेटमध्ये थोडा दिलासा मिळाला खरा… पण गेल्यावेळच्या बजेटमध्ये देण्यात आलेली आश्वासनं अजून पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे यावेळची आश्वासनं पूर्ण होणार का अशीही शंका आता उपस्थित केली जाऊ लागली. एकंदरीतच हे रेल्वे बजेट मुंबईकरांसाठी थोडी खुशी, थोडा गम असंच आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून व्यक्त होत असलेला भाडेवाढीचा अंदाज खरा ठरवत रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी उपनगरीय रेल्वेच्या सेकंड क्लासच्या भाड्यात प्रति किलोमीटर 2 पैशांची वाढ केली. त्यामुळे मुंबईकरांना चर्चगेट ते विरार 2 रुपये आणि सीएसटी ते कल्याण जवळपास दीड रुपया वाढ झाली. भाडेवाढी किरकोळ असल्यानं मुंबईकरांनी विरोध केलेला नाही पण चांगल्या सुविधांची अपेक्षा व्यक्त केली.

मुंबईकरांना अपेक्षित एवढ्या घोषणा झाल्या नसल्या तरी या बजेटनं मुंबईकरांना फारसं निराशही केलेलं नाही. चर्चगेट ते डहाणू रोडपर्यंत लोकल सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तर सीएसटी- कसारा आणि सीएसटी-कल्याण अशा लोकलच्या 75 नवीन फेर्‍याही वाढवण्यात आल्या आहेत.

हार्बर लाईनवर 12 डब्यांच्या लोकलची घोषणाही करण्यात आली. तर लोकल्ससाठी 1500 नवीन कोच दिले जाणार आहेत. त्यामुळे 35 टक्के प्रवासी क्षमता वाढणार आहे. त्याचबरोबर चर्चगेट- विरार फास्ट कॉरीडोरसाठी अभ्यासही सुरू असल्याचं त्रिवेदी यांनी जाहीर केलंय. तर पश्चिम रेल्वेनंतर आता मध्य रेल्वेचंही डीसीतून एसीत रुपांतर केलं जाणार आहे. सीएसटी-कल्याण, सीएसटी-पनवेल एलिव्हेटेड कॉरीडॉरचा रेल्वे विकास महामंडळ सर्व्हे करतअसल्याचंही त्रिवेदी यांनी सांगितलंय. तर नवी मुंबईत कोच देखभाल केंद्रही तयार केलं जाणार आहे. पण या सर्व घोषणा प्रत्यक्षात येणार कशा आणि कधी असा प्रश्न खासदारांना पडला आहे.

तर दुसरीकडे गेल्यावेळच्या बजेटमध्ये मुंबईकरांसाठी करण्यात आलेल्या घोषणा प्रत्यक्षात आल्या नसल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे.या घोषणा तर झाल्या पण आमचे हे प्रश्न सुटणार कधी असा सवाल मुंबईकर विचारतायत. एकूणच मुंबईकरांना थोडी खुशी आणि थोडा गम देणारं हे बजेट ठरलं आहे. आता या घोषणा प्रत्यक्षात उतरतील अशीच अपेक्षा मुंबईकर ठेऊन आहेत.मुंबईला काय मिळालं?1. चर्चगेट ते डहाणू रोड लोकल2. सीएसटी- कसारा, सीएसटी-कल्याण 75 नवीन फेर्‍या3. हार्बर लाइनवर 12 डब्यांच्या लोकल4. लोकलसाठी 1500 नवीन कोच 35 टक्के प्रवासी क्षमता वाढणार 5. चर्चगेट- विरार फास्ट कॉरीडॉरचा अभ्यास6. मध्य रेल्वेचं डीसीतून एसीत रूपांतर 7. सीएसटी-कल्याण, सीएसटी-पनवेल एलिव्हेटेड कॉरीडॉरसाठी सर्व्हे8. नवी मुंबईत कोच देखभाल केंद्रभाडेवाढप्रति किलोमीटर 2 पैशांची वाढ चर्चगेट ते विरार 2 रु.सीएसटी ते कल्याण दीड रु.

close