पुण्यात उपमहापौराची ‘खुर्ची’ दीपक मानकरांकडे

March 15, 2012 5:09 PM0 commentsViews: 7

15 मार्च

पुण्यात आज महापौरपदापेक्षा उपमहापौरपदाच्या निवडणुकीकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. याला कारणीभूत ठरली ती काँग्रेसने वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या दीपक मानकर यांना मिळालेली उमेदवारी. त्यांच्या या उमेदवारीला काँग्रेसमधून आव्हान मिळालं होतं, पण ऐनवेळी त्या बंडखोर उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला. आणि अखेर दीपक मानकर यांची पुण्याच्या उपमहापौरपदी निवड झाली.

पुणे महापालिकेत आज पुन्हा कलमाडी आणि मानकरांच्या नावाच्या घोषणा घुमल्या. निमित्त होतं उपमहापौरपदाच्या निवडणुकीचं. पाच वर्ष उपमहापौरपद काँग्रेसकडे राहणार अशी घोषणा केली आणि त्यासाठी दीपक मानकर यांचं नाव जाहीर झालं. मानकरांचं नाव पुढं येताच सगळ्यांकडून टीका व्हायला सुरुवात झाली. तर दुसरीकडं त्यांना थेट काँग्रेसमधूनच आव्हान मिळालं. कलमाडी गटाच्या हाती सत्ता गेल्याने काँग्रेसची बदनामी होत असल्याचं म्हणत आमदार विनायक निम्हण यांनी त्यांच्या गटातल्या मुकारी अलगुडेंचा उमेदवारी अर्ज उपमहापौरपदासाठी दाखल केला. अखेर शेवटच्याक्षणी हा अर्ज मागे घेण्यात आला. आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार दीपक मानकर उपमहापौरपदी निवडून आले.

गाजलेल्या नातू प्रकरणातून दीपक मानकर यांची निर्दोष मुक्तता झाली असली तरी मानकर यांच्यावर इतर अनेक गुन्हे दाखल आहेत. मानकर यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यावर सध्या विनयभंग, आर्म्स ऍक्ट असे एकूण 7 गुन्हे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

कट्टर कलमाडी समर्थक मानल्या जाणार्‍या दीपक मानकर यांची ही निवड म्हणजे काँग्रेसच्या राजकारणाची वाटचाल गुन्हेगारीकरणाकडं सुरु असल्याचं बोललं जातंय.

close