आठवले नाराज, महायुतीत तणाव

March 17, 2012 1:12 PM0 commentsViews: 8

17 मार्च

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांना शिवसेनेनं राज्यसभेची उमेदवारी नाकारल्याने आता महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. महायुतीमुळे ज्या प्रभाग समिती किंवा इतर समित्यांचं सदस्यत्व मिळालं होतं किंवा मिळणार होतं ती सर्व पदं आरपीआय नेते परत करणार असल्याचे आरपीआय नेत्यांनी सांगितले आहे. आज होणार्‍या विजयोत्सवाला आरपीआयचे सगळे नेते गैरहजर राहणार आहेत.आम्ही महायुतीला मतं मिळवून दिली त्याची शिवसेनेनं अशी परतफेड करायला नको होती, अशा शब्दात आरपीआयच्या नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रामदास आठवले यांनी भेट घेतल्यानंतर (ठरवून) झालेल्या महायुतीला सत्ता स्थापनेनंतर आता तडे जाऊ लागले आहे. रामदास आठवले यांनी या अगोदर केलेल्या 'पक्ष भ्रमणा'मुळे थेट शिवसेनेच्या दारावर येऊन थांबल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. भीमशक्ती-शिवशक्ती असा नारा देत दणक्यात महायुतीची घोषणा झाली. पण रामदास आठवले यांना याबद्दल राज्यसभेची उमेदवारी मिळणार अशी चर्चा रंगली. खुद्द आठवलेंनी राज्यसभेची जागा आपल्याला मिळेल अशी ग्वाही आयबीएन लोकमतकडे दिली होती. पण ऐनवेळी शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी उमेदवारी देऊन आठवलेंना ठेंगा दाखवला. आणि जे घडायचे होते तेच घडले. आरपीआय नेत्यांनी नाराजीचा सुर लगावला.

आज आरपीआयच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावनांना मार्ग मोकळा करुन दिला. शिवसेनेनं असं करायला नको होतं अशी दुखद प्रतिक्रीया आरपीआयच्या नेत्यांनी दिली. त्याचबरोबर महायुतीमुळे ज्या प्रभाग समिती किंवा इतर समित्यांचं सदस्यत्व मिळालं होतं किंवा मिळणार होतं ती सर्व पदं आरपीआय नेते परत करणार असल्याचे आरपीआय नेत्यांनी सांगितले आहे. आणि आज होणार्‍या विजयोत्सवाला आरपीआयचे सगळे नेते गैरहजर राहणार आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत आठवले यांनी आपल्या कवीमनाने तमाम शिवसैनिकांना-भीमसैनिकांना खेळीमेळीत ठेवले अनेक ठिकाणी युतीला विजयी होण्यास मदत केली. याची कबुली खुद्द विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी भर जाहीर सभेत दिली. पण आता 'मी कवी दुखाचा' अशीच अवस्था आठवलेंची झाली असावी.

close