आदर्श प्रकरणी आणखी दोन जणांना अटक

March 21, 2012 10:12 AM0 commentsViews: 3

21 मार्च

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वर्षभरानंतर सीबीआयने कारवाईला सुरुवात केली. काल तीन अधिकार्‍यांना अटक केल्यानंतर आज सीबीआयने दोघांना अटक केली आहे. आदर्शचे को प्रमोटर कन्हैय्यालाल गिडवाणी यांना अखेर अटक करण्यात आली. गिडवानी यांना काल लाचखोरीच्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर आज त्यांची आर्थर रोड जेलमधून सुटका होताच सीबीआयने अटक केली. तर तिकडे निवृत्त मेजर जनरल ए.आर.कुमार यांनाही सीबीआयने अटक केली आहे. कुमार यांना हैद्राबादमध्ये अटक करण्यात आली. त्यांना आज हैदराबाद कोर्टात हजर केलं जाणार आहे. दरम्यान आपण सीबीआयला पूर्ण सहकार्य करणार असल्याचं गिडवानींनी म्हटलं आहे.

आदर्श प्रकरणी काल 3 सदस्यांना अटक करण्यात आलीये. यात आदर्श सोसायटीचे प्रवर्तक आर.सी.ठाकूर, नगरविकास विभागाचे पी.व्ही.देशमुख, सोसायटीचे अध्यक्ष एम.एम.वांच्छू यांचा समावेश आहे.. एम. एम.वांच्छू आणि सेक्रेटरी आर.सी.ठाकूर यांना मंुबईतून तर तिसरे आरोपी पी. व्ही. देशमुख यांना पुण्यातून अटक करण्यात आलीय. शिवाय आणखी काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचंही समजतं. याप्रकरणात एकूण 14 जणांना आरोपी बनवण्यात आलंय. त्यापैकी तिघांना काल अटक करण्यात आली. पण सीबीआयने या प्रकरणात 14 जणांवर गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे इतर 9 जणांना कधी अटक होणार असा प्रश्न आता सगळे विचारत आहे.

close