सरकारी शाळेतच नक्षलवादी तयार होतात – श्री श्री रविशंकर

March 21, 2012 1:32 PM0 commentsViews: 13

21 मार्च

सरकारी शाळेतच नक्षलवादी तयार होतात, त्यामुळे सरकारी शाळेची गरज नाही असं खळबळजनक वक्तव्य आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी केलं आहे. जयपूरमध्ये एका खासगी शाळेच्या कार्यक्रमात श्री. श्री. रविशंकर बोलत होते. तसेच सरकारी शाळांमधील शिक्षकच विद्यार्थ्यांच्या अवस्थेला जबाबदार असल्याचा आरोपच श्री श्री रविशंकर यांनी केला.

नेहमी शांत, आध्यात्मिक जीवन कसे जगावे यांचा धडा देणारे श्री. श्री. रविशंकर यांनी शाळेबद्दल केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फोडले. काल मंगळवारी जयपूर येथील एका शाळेच्या मैदानात झालेल्या कार्यक्रमात श्री. श्री. यांनी सरकारी शाळेतच नक्षलवादी तयार होतात असं खळबळजनक विधान करुन सरकारी शाळेची गरज नाही असा सल्लाच देऊन टाकला. तसेच सरकारी शाळांमधील शिक्षकच विद्यार्थ्यांच्या अवस्थेला जबाबदार असल्याचा आरोप श्री श्री रविशंकर यांनी केला. मात्र आपल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला हे लक्षात येताच सारवासारव केली. माझे वक्तव्य हे देशातील सर्व शाळेसाठी नव्हते ते फक्त नक्षलग्रस्त भागातील शाळेसाठी म्हटले होते. याच भागात खासगी शाळेत शिकणार्‍या विद्यार्थी कधी नक्षली बनत नाही असा खुलासा श्री. श्री. यांनी केला. मात्र रविशंकर यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी नाराजी व्यक्त केली. मी सुध्दा सरकारी शाळेत शिकलो मग मी पण नक्षलवादी झालो का ? अशा खडा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला.