शिवसेनेला ‘हात’ दाखवत ‘इंजिन’मुळे आघाडीची सत्ता

March 21, 2012 5:03 PM0 commentsViews: 2

माधव सावरगावे, औरंगाबाद

21 मार्च

औरंगाबाद जिल्हा परिषद युतीकडून हिसकावण्यात आघाडीला यश मिळालं आहे. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला सगळ्यात जास्त जागा मिळाल्या होत्या पण तरीही आघाडीने जिल्हा परिषदेवर कब्जा केला. जि.प.च्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या नाहिदाबानो फिरोज पठाण तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या विजया कदम निवडून आल्या आहेत. मनसेनं आघाडीला केलेल्या सहकार्याचा युतीला फटका बसला आहे.

औरंगाबादच्या या जिल्हा परीषदेवर सत्तेसाठी आवश्यक असलेली 31 ची मॅजिक फिगर गाठणं युतीला सहज शक्य होतं. कारण त्यांना आशा होती ती मनसेच्या पाठिंब्यांची. पण मनसेनं युतीला नाकारलं आणि आघाडीशी घरोबा केला. ग्रामीण भागात शिवसेनेचा जनाधार घटला आणि त्याच जागी मनसेचा जिल्हा परिषदेत उदय झाला. ठाण्यात मनसेनं सेनेला दिलेली साथ पण नाशिकमध्ये सेनेनं मनसेला दिलेला धक्का यामुळेच मनसेनं नाशिकचा वचपा औरंगाबादमध्येही काढल्याचं मानलं जातंय.

मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव नाराज

दरम्यान, आघाडीला मनसेनं पाठिंबा दिल्यामुळे मराठवाड्यातील मनसेचे एकमेव आमदार हर्षवर्धन जाधव मात्र नाराज झाले आहेत. जानेवारी 2011 मध्ये जाधव यांना पोलिसांनी मारहाण केली होती, आणि यावेळी सेना-भाजपने जाधव यांची पाठराखण केली होती. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आघाडीला मदत करणार नाही अशी भूमिका जाधव यांनी घेतली. तसेच जाधव समर्थक 2 सदस्यांनीही युतीलाच मतदान केलंय पण यामुळे मनसेत मात्र खळबळ माजली आहे.

close