आदर्श प्रकरणी जयराज फाटक , प्रदिप व्यास निलंबित

March 22, 2012 9:53 AM0 commentsViews: 1

22 मार्च

आदर्श प्रकरणात जयराज फाटक आणि प्रदीप व्यास या दोन अधिकार्‍यांचं निलंबन करण्यात आलंय. सरकारने आज कोर्टात ही माहिती दिली. मुंबई हायकोर्टात या प्रकरणी आज महत्त्वाची सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने या प्रकरणाशी संबंधित सर्वच यंत्रणांना फटकारलं. आणि यावेळी कोणत्याही मोठ्या व्यक्तीवर कारवाई करावी लागली तर मागेपुढे पाहू नका असे आदेश कोर्टाने सीबीआयला दिले.

आदर्श घोटाळ्याप्रकरणी आयएएस अधिकारी जयराज फाटक आणि प्रदीप व्यास यांना पदांवरून निलंबित करण्यात आलंय. हा घोटाळा झाला तेव्हा फाटक हे मुंबई महापालिकेचे आयुक्त होते, तर व्यास जिल्हाधिकारी होते. फाटक सध्या उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे संचालकीय व्यवस्थापक होते, तर व्यास अर्थ खात्याच्या खर्च विभागाचे सचिव होते. पण, निलंबनाची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात करण्याऐवजी थेट कोर्टात माहिती कशी दिली असा जाब विरोधकांनी विचारला.

दरम्यान, हायकोर्टाने सुनावणीच्या वेळी आज या प्रकरणातल्या सर्वच यंत्रणांना कोर्टानं खडे बोल सुनावले. कितीही मोठ्या लोकांवर कारवाई करायची वेळ आली तरी मागे पुढे पाहू नका, असा महत्त्वाचे आदेशही दिला. आदर्शबाबत झालेली चूक मान्य करावी आणि आदर्शची इमारत सोसायटीच्या लोकांनी सरकारी जमा करावी, तसं झाल्यास समाजात एक वेगळा संदेश जाईल अशी सूचनाही कोर्टाने केली. बुधवारी अटक केलेल्या तीन आरोपींना 31 मार्चपर्यंत, कन्हैयालाल गिडवाणी यांना 26 मार्चपर्यंत सीबीआय कोठडी मिळाली आहे.

close