प्रामाणिक अलकाचा जाहीर सत्कार

March 22, 2012 3:50 PM0 commentsViews: 2

22 मार्च

डोंबिवलीमध्ये कचरा वेचण्याचं काम करणार्‍या अलका सरोदे हिनं दाखविलेल्या प्रामाणिकपणाचं सर्व स्तरांतून कौतुक होतंय. कचरा वेचत असताना सापडलेले 8 लाख रुपयांचे सोन्यांचे दागिने पोलिसांकडे परत केले. अत्यंत गरीब कुटुंबात वाढलेल्या अलकाने आपल्या गरिबीची चिंता न करता दाखविलेला प्रामाणिकपणा हा नक्कीच कौतुकास्पद आहे. तिच्या याच प्रामाणिकपणाची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच अलकाच्या 3 बहिणींच्या शिक्षणाचा खर्चही आता राष्ट्रवादी काँग्रेस करणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.

मुंबईत डोंबिवली येथील राहुल नगरमध्ये राहणार्‍या कचरा वेचणार्‍या अलका सरोदे हिला 14 मार्चला आठ लाखांचे दागिने सापडले. काळूनगरमधल्या वेदांत सोससायटीतले विनय उलकंदे तुळजापूरला गेले होते. जाताना त्यांनी कपाटात ठेवलेले दागिने एका पिशवीत भरून घरातल्या कचर्‍याच्या डब्याजवळ ठेवले.पण त्यांच्या सुनेकडून नजरचुकीने दागिन्यांचीच पिशवी कचर्‍याच्या डब्यात टाकली गेली. देवदर्शनावरून परतल्यानंतर उलकंदे यांनी दागिन्याच्या पिशवीचा शोध घेतला असता ती कचरापेटीत गेल्याचे त्यांच्या लक्षात आलं.

याप्रकरणी त्यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. अलकाला कचर्‍यामध्ये ती पिशवी सापडल्यावर तिनं ती पोलिसांना नेऊन दिली. अलकाचा प्रामाणिकपणा पाहुन पोलीस ही हारखून गेले. अलकाचे कौतुक करत उलकंदे दाम्पत्यांनी तिचे आभार मानले तसेच अलकाला रोख रक्कम देऊन तिचा सत्कारही केला. तिचा हाच प्रामाणिकपणा पाहुन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी जाहीर सत्कार केला. तर अलकाच्या 3 बहिणींच्या शिक्षणाचा खर्चही आता राष्ट्रवादी काँग्रेस करणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.

close