‘आदर्श’ दिलजमाई ?

March 24, 2012 12:56 PM0 commentsViews: 3

24 मार्च

राज्याचे दोन माजी मुख्यमंत्री आपासातले मतभेद विसरुन आज चक्क चहापानासाठी भेटले. विलासराव देशमुख यांनी आज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड इथल्या घरी भेट घेतली. मराठवाड्यातल्या या दोन काँग्रेस नेत्यांमध्ये आदर्श प्रकरणामुळे वैर निर्माण झालं होत. पण आज त्यांनी अर्धातास चर्चा केली आणि आम्ही सोबत असल्याचं जाहीर करून टाकलं. पण आता त्याच 'आदर्श' प्रकरणावरुन दोघांमध्ये दिलजमाई झाली की काय अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

राजकारणात कुणीच कायमचे शत्रू किंवा मित्र नसतात. याचाच प्रत्यय महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा येतोय. गेल्या काही दिवसांपासून.. एकमेकांवर कुरघोडी करणारे मराठवाड्यातले हे दोन काँग्रेसचे नेते आता एकत्र आलेत. एकीकडे कोर्टाचा ससेमिरा.. आणि दुसरीकडे न्यायालयीन आयोगाची टांगती तलवार.. अशा दुहेरी कात्रीत अडकलेले हे दोन्ही काँग्रेस नेते एकत्र आलेत. आम्ही यापुढे एकमेकांना मदत करू, असं जाहीर करून त्यांनी राज्याच्या राजकारणाला नवं वळण लागण्याचे संकेत दिले आहे.मुख्यमंत्री बनताच अशोकरावांनी विलासरावांना धक्का दिला. लातूरचे विभागीय महसूल कार्यालय नांदेडला हलविण्याचा एक तर्फी निर्णय अशोकरांवानी घेतला. त्यानंतर दोघांमधील संबंध ताणले गेले होते. अशातच आदर्श घोटाळ्यात अशोक चव्हाणांना खुर्ची गमवावी लागली आणि ते राज्याच्या राजकारणात एकाकी पडले. पण याच घोटाळ्यात आता विलासराव अडकले आहे.

तिकडे कर्नाटकात येडियुरप्पांचं पुनर्वसन झालं तर माझंही व्हावं, अशी मागणी अशोक चव्हाण करण्याच्या बेतात आहेत. म्हणूनच एकाकी पडलेल्या अशोकरावांनी विलासरावांकडे मैत्रीचा हात पुढं केला आहे. आदर्शप्रकरणी आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये अशोकराव आणि विलासरावांनी एकमेकांकडे बोट दाखवायचं टाळलं होतं. आता आयोगाचा अंतरिम अहवाल सादर होतोय. कदाचित तो अहवाल या दोन्ही नेत्यांसाठी अनकुल ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आगामी काळातल्या राजकीय घडामोडींचा विचार करता. अशोक चव्हाण आणि विलासरावांची ही दिलजमाई बरच काही सांगून जातेय.

close