केजरीवाल यांचा 14 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा जाहीर आरोप

March 25, 2012 4:39 PM0 commentsViews: 4

25 मार्च

लोकपाल विधेयक कायदा असता तर केंद्रातल्या 14 विद्यमान मंत्र्यांविरोधात पोलिसात गुन्हे दाखल झाले असते, आणि ह्या मंत्र्यांना आपल्यापदावरून खाली उतरावे लागले असते असा आरोप टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी केला. तसेच त्यांनी 14 मंत्र्यांची नावं आणि त्यांच्याविरोधातले आरोप वाचून दाखवले. त्यांनी यादीची सुरुवात पी. चिदंबरम यांच्या नावाने सुरु केली. चिदंबरम यांचे नाव टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात आले होते जर लोकपाल कायदा असता तर त्यांना राजीनामा द्यावा लागला असता असा आरोप पुन्हा एकदा केला.

यात केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचंही नाव आहे. अब्दुल करीम तेलगीच्या स्टॅम्प घोटाळयात शरद पवारांचं नाव आलं होतं. गहू आयात घोटाळ्यातही त्यांचं नाव होतं तसेच त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अनेक संस्थांना अतिशय नाममात्र दरात जमिनी मिळाल्यायत असा आरोप केजरीवाल यांनी केला. या अगोरद अण्णा हजारे यांनी सुध्दा आपल्या ब्लॉगमधून चौघांची चांडाळ चौकडी आहे असा आरोप करत कपील सिब्बल,चिदंबरम यांच्याकडे बोट दाखवली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा एक पाऊल पुढे टाकत केजरीवाल यांनी 14 मंत्र्यांचीच यादी जाहीर वाचून दाखवली.

केजरीवाल यांच्या यादीत कोण कोण होते ?

1) पी. चिदंबरम, गृहमंत्री – टू जी घोटाळा प्रकरणात नाव- चिदंबरम वित्तमंत्री असताना भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या एका उद्योजकाचं वकीलपत्र चिदंबरम यांच्या पत्नीनं घेतलं

2) अजित सिंग, हवाई वाहतूक मंत्री- यूपीए 1 च्या काळात विश्वासदर्शक ठरावावेळी लाच घेऊन सरकारला मतदान

3) फारुख अब्दुल्ला, अपारंपरिक ऊर्जा मंत्री- जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या दोन खजिनदारांनी केला भ्रष्टाचार आरोप – पक्ष कार्यकर्त्याच्या खून प्रकरणात नाव

4) टी. के. वासन, जहाज बांधणी मंत्री- मीठागारांसाठी 16 हजार एकर जमीन अत्यल्प किंमतीत भाडेपट्टीवर दिल्याचा आरोप

5) कमलनाथ, नागरी विकास मंत्री- तांदूळ निर्यात घोटाळाप्रकरणी आरोप- विश्वासदर्शक ठरावावेळी खासदारांना लाच दिल्याचा आरोप

6) कपिल सिब्बल, दूरसंचार मंत्री- रिलायन्सला 650 कोटींचा दंड होता, सिब्बलांच्या मध्यस्थीमुळे तो केवळ 5 कोटीवर आणण्यात आल्याचा आरोप

7) शरद पवार, कृषीमंत्री- मुद्रांक घोटाळा प्रकरणात तेलगीनं घेतलं नाव- गहू आयात प्रकरणी घोटाळा केल्याचा आरोप- कृष्णा खोरे विकास योजनेतील जमीन स्वस्तात पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना मिळाल्याचा आरोप

8) श्रीप्रकाश जैस्वाल, कोळसामंत्री- 11 लाख कोटींच्या कोळसा खाण वाटप घोटाळ्यात नाव

9) सुशीलकुमार शिंदे, ऊर्जामंत्री- आदर्श घोटाळा प्रकरणी आरोप

10) विलासराव देशमुख, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री- आदर्श घोटाळा प्रकरणी आरोप- सुभाष घईंना फिल्मसिटी बनवण्यासाठी अत्यल्प किंमतीत जमीन दिल्याचा आरोप- कर्जबाजारी शेतकर्‍याची पिळवणूक करणारे आमदार सानंदा यांना पाठिशी घातल्याप्रकरणी कोर्टाचे ताशेरे

11) एम. के . अलागिरी, केमिकल अँड फर्टिलाईझर मंत्री- मारामारी, गुंडगिरीचे आरोप- जमीन घोटाळ्याचा आरोप

12) वीरभद्र सिंग, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री- माजी आयपीएस अधिकार्‍याकडून लाच मागितल्याचा आरोप

13) एस. एम. कृष्णा, परराष्ट्र मंत्री- कर्नाटकातल्या खाण घोटाळा प्रकरणी थेट आरोप

14) प्रफुल्ल पटेल, भारी उद्योग मंत्री- वाहतूक मंत्री असताना आवश्यकता नसतानाही विमान खरेदीचा आरोप- एका करारात 2.50 लाख डॉलरची लाच घेतल्याचा आरोप

close