दलालाने दिली होती 14 कोटींची ऑफर – लष्करप्रमुख

March 26, 2012 5:36 PM0 commentsViews: 3

26 मार्च

काही दिवसांपूर्वी जन्मतारखेच्या वादावरुन चर्चेत असलेल्या लष्कर प्रमुखांनी आज एक गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली. लष्करासाठी दुय्यम दर्जाच्या वाहन खरेदीसाठी एका दलालाने आपल्याला 14 कोटींची लाच देऊ केली होती, असा गौप्यस्फोट लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी केला. सिंग यांच्या या आरोपाचे पडसाद संसदेतही उमटले. संरक्षण मंत्र्यांनी या आरोपाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. लष्कर प्रमुख म्हणतात, त्याने मला रोख रक्कम दिली नाही. तो म्हणत होता ही फाईल तुम्ही पास केली तर तुम्हाला ही रक्कम मिळेल. सगळेच असं करतात, तुम्हाला काय त्रास आहे.

लष्करासाठी वाहन खरेदी करण्यासाठी एका दलालाने 14 कोटींची लाच देऊ केल्याच्या लष्कर प्रमुखांच्या या खुलास्यावरुन प्रचंड खळबळ माजली. संसदेतही त्याचे पडसाद उमटले. लष्कर प्रमुखांनी माहिती देऊनही काहीच कारवाई न करणार्‍या संरक्षण मंत्र्यांविरोधात विरोधकांनी मोर्चा उघडला. भाजपचे खासदार जसवंत सिंग म्हणतात, संरक्षण मंत्र्यांनी आता तरी जागं व्हावं. लष्कर प्रमुखांवर खूप मोठी जबाबदारी असते. पण अशावेळी संरक्षण मंत्र्यांकडून जो प्रतिसाद मिळाला तो इतका असमाधानकारक होता की त्यांना प्रसार माध्यमाकडे जावं लागलं.

काँग्रेसही तात्काळ संरक्षण मंत्री ए. के. ऍन्टोनींच्या पाठिशी उभी राहिली आणि लष्कर प्रमुखांवरच प्रश्नचिन्हं उपस्थित केलं. काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी म्हणतात, जर एखाद्याने लष्कर प्रमुखांना लाच देण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांनी त्या व्यक्तिविरोधात गुन्हा नोंदवायला हवा होता.

संरक्षण मंत्र्यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिलेत. पण या प्रकरणात संशयाची सुई संरक्षण गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुख जनरल तेजिंदर सिंग यांच्याकडे इशारा करतेय.या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही. मला याविषयी काहीच बोलायचं नाही असं सांगून तेजिंदर सिंग यांनी उत्तर टाळलं. मात्र या आरोपांचा इन्कार करत व्ही. के. सिंग यांच्यविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. लष्कर प्रमुखांच्या खुलाशामुळे मोठं वादळ निर्माण झालंय. पण त्यावर काही प्रश्नही उपस्थित झाले आहे. अनुत्तरित प्रश्न – लष्कर प्रमुखांनी केलेल्या आरोपांविषयी संरक्षण मंत्र्यांनी इतका काळ मौन का बाळगलं ?- सरकारनं आता सीबीआय चौकशी का सुरु केली ?- ज्या वेळी लाच देण्याचा प्रयत्न झाला त्याचवेळी लष्कर प्रमुखांनी एफआयआर दाखल का केली नाही?- निवृत्त होण्याच्या काही काळाआधीच लष्कर प्रमुखांनी हा मुद्दा का काढला?

जन्मतारखेच्या वादामुळे व्ही. के. सिंग यांची चांगलीच मानहानी झाली होती. पण निवृत्तीच्या आधी आपली लष्करी प्रतिष्ठा कायम राहावी, यासाठीचा लष्करप्रमुखांचा हा प्रयत्न असल्याची आता चर्चा आहे.

close