दरवाढीमुळे आघाडी गॅसवर !

March 26, 2012 5:42 PM0 commentsViews: 2

26 मार्च

अर्थमंत्री अजित पवार यांनी आज आपला दुसरा अर्थसंकल्प सादर केला. काही दिलासा देणार्‍या घोषणा त्यांनी केल्या असल्या तरी घरगुती गॅसवर 5 टक्के करवाढ प्रस्तावित केली आहे. त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे. या दरवाढीला काँग्रेसच्या नेत्यांनीच विरोध केल्यामुळे आता काँग्रेस-राष्ट्रवादीत पुन्हा एकदा जुंपण्याची चिन्हं आहेत. जिल्हा परिषद निवडणुकांवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत सुरू असलेली खडाजंगी आता आणखी वाढणार असं दिसतंय. राज्याचा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवारांनी एलपीजी गॅस सिलेंडरवर 5 टक्के करवाढ प्रस्तावित केली. त्यामुळे आता घरगुती गॅस 20 रुपयांनी महागणार आहे. त्यावरून काँग्रेसचे मंत्री आणि आमदार नाराज झालेत. आणि ही दरवाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी प्रदेश काँग्रेसचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. राज्याच्या तिजोरीवरचा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी दरवाढ गरजेची आहे, असं अर्थमंत्र्यांनी म्हटलंय. तर अर्थसंकल्पात विकासाचा उद्देश ठेवण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यानी सांगितले आहे. विरोधकांनी अजितदादांच्या या अर्थसंकल्पावर कडाडून टीका केली.घरगुती गॅस महागणार असलं तरी वीजबिलाची थकबाकी असणार्‍यांना मात्र दिलासा मिळणार आहे. थकबाकीवरील शंभर टक्के व्याज माफ करण्याचा निर्णय महावितरणने घेतल्याची घोषणा अजित पवारांनी केली. तसेच वीजनिर्मितीसाठी 15 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शेतकर्‍यांच्या हिताकडे अर्थसंकल्पात लक्ष देण्यात आल्याचा दावा, अर्थमंत्र्यांनी केला.

close