नक्षलवाद्यांकडून भूसुरुंग स्फोट, 12 जवान शहीद

March 27, 2012 9:28 AM0 commentsViews: 13

27 मार्च

महाराष्ट्रात नक्षलवादी पुन्हा एकदा सक्रीय झालेत. गडचिरोलीतल्या पुस्तोला गावात नक्षलवाद्यांनी आज एक जबरदस्त भूसुरुंग स्फोट घडवून आणला. यात सीआरपीएफचे 12 जवान शहीद झाले आहे. विशेष म्हणजे गरीब आदिवासींसाठी काही वस्तू घेऊन जाणार्‍या पोलिसांच्या गाडीला नक्षलवाद्यांनी लक्ष्य बनवलंय. त्यामुळे गरीबांचे कैवारी म्हणवणारे नक्षलवादी खरचं आदिवासींचा विचार करतात का, हा प्रश्न उपस्थित झाला.

आज गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात सीआरपीएफचे 12 जवान शहीद झाले आहे. तर, 16 जवान जखमी झाले आहेत. गडचिरोलीपासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या धानोरा तालुक्यातल्या पुस्तोला गावात ही घटना घडलीय. सीआरपीएफचे जवान पुस्तोलाहून बसमध्ये जात होते. त्यावेळी भूसुरुंगाचा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी भयानक होती की, स्फोटामुळे बस हवेत उडाली,आणि भीषण पेट घेतला. यामुळे काही जवानांचा होरपाळून मृत्यू झाला तर काहीजण बाहेर फेकले गेले. घटनास्थळीच 12 जवानांनी अखेरचा श्वास घेतला. नक्षलवाद्यांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर सीआरपीफची आणखी एक टीम मदतीसाठी पाठवण्यात आली आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू वाटण्यासाठी गट्‌ट्याला कार्यक्रम होता. त्यासाठी वस्तू घेऊन सीआरपीएफचे जवान जात होते. पहिल्या पथकाने सकाळी रस्त्याची पाहणी केली. त्यावेळी भुसुरुंग आढळला नाही. दुसर्‍या पथकात चार सुमो आणि दोन बस होत्या. पहिल्या तीन गाड्या रवाना झाल्या. पण शेवटची गाडी स्फोटात सापडली. त्यातच सर्वाधिक जवान होते. नागपूर आठ जवानांवर उपचार सुरू होते. त्यापैकी एका जवानाचा मृत्यू झाला. ग्रामविकासमंत्री जयराम रमेशनी या भागाला भेट दिली होती त्यांनी नक्षलवाद्यांचा बिमोड करावा, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळेही नक्षलवादी चिडल्याची शक्यता आहे. दोनच दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी पत्रकं वाटली होती.

नक्षलवाद्यांचा हल्ला

- स्फोटात आरडीएक्स चा वापर झाला असावा – स्फोटकं खोलवर ठेवली होती – राज्याचे डीजीनागपूरला गेले – टार्गेट सेंट्रल फोर्सेस

नक्षलवादी हल्ले

गडचिरोलीमध्ये यापुर्वी दोनदा मोठे नक्षलवादी हल्ले झालेत.1 फेब्रुवारी 2009 ला धानोरा तालुक्यातल्या नक्षलवादी हल्ल्यात 11 पोलीस शहीद झाले होते. या पोलिसांना नक्षलवाद्यांनी अतिशय क्रूरपणे मारलं होतं. त्यानंतर 24 मे 2009 ला याच धानोर्‍यामध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत 16 पोलीस शहीद झाले होते. यात 5 महिला पोलिसांचा समावेश होता.

close