ठाण्यात शिवसेनेला काँग्रेसची साथ ?

April 1, 2012 11:41 AM0 commentsViews: 2

विनय म्हात्रे आणि विनोद तळेकर, मुंबई

01 एप्रिल

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील भांडण आता टोकाला गेलंय. ठाण्याच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत काँग्रेस शिवसेनेसोबत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीला मदत करायची नाही अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. येणार्‍या पाच महापालिकांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार अशी घोषणाही प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे केली आहेत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीतली दरी आता जास्तच रुंदावत चालली आहे. ठाण्यात स्थायी समितीच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला मदत करणार नसून.. शिवसेनेची साथ देईल, अशी माहिती सूत्रांनी आयबीएन लोकमतला दिली. त्यामुळे ठाण्यात शिवसेना, भाजप आणि काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी आणि मनसे.. असा नवा पॅटर्न निर्माण होऊ शकतोय.

विदर्भात जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपची मदत घेऊन काँग्रेसला हरवलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या श्रेष्ठींकडे राष्ट्रवादीची तक्रार केली होती. त्यावर शरद पवारांनीही काँग्रेसला दम दिला होता.

आता काँग्रेसनंही विदर्भाचा वचपा ठाण्यात काढायचं ठरवलंय. एवढंच नाही, तर येणार्‍या पाच महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची मदत घ्यायची नाही, असंही काँग्रेसने ठरवलंय. त्यामुळे परभणी, लातूर, चंद्रपूर, भिवंडी-निझामपूर आणि मालेगाव या पाचही ठिकाणी आघाडीत बिघाडी झाली. अजित पवारांना 2014 साली मुख्यमंत्री व्हायचंय, हे उघड गुपित आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये वर्चस्वासाठी पुढची दोन वर्षं संघर्ष चिघळत जाणार, हेच या घडामोडींवर स्पष्ट होतंय.

close