क्रॉम्प्टन ग्रीव्हजच्या कामगारांना पगारवाढ

November 23, 2008 1:09 PM0 commentsViews: 10

23 नोव्हेंबर, मुंबई शिल्पा गाड सध्या सगळीकडे आर्थिक मंदी सुरू आहे आणि या मंदीचा सामना करण्यासाठी काही कंपन्या कामगार कपातीचं धोरण अवलंबत आहे. तर काही कर्मचार्‍यांना सक्तीची विश्रांती. पण मुंबईतल्या क्रॉम्प्टन ग्रीव्हजनं मात्र कामगारांचे पगार वाढवलेत.आर्थिक मंदीच्या काळात अनेक कंपन्या कामगार कपातीचं धोरण अवलंबत आहेत पण त्यातही क्रॉम्टनच्या कांजूर ब्राँचनं कामगारांच्या पगारात 30 ते 40 टक्के वाढ केलीय. कामगार युनियन आणि मॅनेजमेंटमधील उत्तम समन्वयानं हे शक्य झालं. ' आम्हाला गेले काही महिने खूपच टेन्शन होतं. इतर कंपन्यांमधील घटना ऐकून घाबरायला व्हायचं पण कंपनीनं पगारवाढ केलीय. त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत ', असं कामगार तानाजी सावंत सांगत होते. क्रॉम्प्टन कंपनीत पॉवर ट्रॉन्सफार्मर बनवले जातात. ट्रॉन्सफार्मर मार्केटला मंदीची कमी झळ बसलीय. कामगारांना महिन्याला कमीत कमी 1800 ते 3 हजार रुपये पगारवाढ मिळाली आहे. या बदल्यात कामगारांना जादा काम करावं लागणार आहे. 'आम्ही पूर्वी 120 टक्के काम करत होता. आता आम्हाला ते 133 टक्के करावं लागणार आहे. म्हणजे जवळपास 10 टक्के वाढ होणार आहे ', असं कामगार संघटनेचे युनिट अध्यक्ष केशव तुळसकर यांनी सांगितलंय. क्रॉम्प्टनच्या देशभरात जवळपास 27 शाखा आहेत. त्यापैकी केवळ याच ब्राँचमध्ये पगारवाढ झाली आहे. मंदीतली ही छोटीशी आशाच म्हणावी लागेल.

close