ना’राज’ हर्षवर्धन जाधव मागे फिरले

April 2, 2012 12:12 PM0 commentsViews: 13

02 एप्रिल

मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेत प्रवेशाच्या विषयाला सध्यातरी ब्रेक लावला आहे. संध्याकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार होते मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा झाल्यानंतर पत्रकार परिषद रद्द केली आहे. मात्र शिवसेना प्रवेशाचा 'राज'मात्र अजूनही कायम आहे. औरंगाबाद जि.प.मध्ये कन्नड तालुक्यातल्या राष्ट्रवादीच्या नेत्याला सभापतीपद मिळू नये अशी मागणी जाधव यांनी केली होती. ती मान्य न झाल्याने जाधव नाराज होते. आयबीएन-लोकमशी बोलताना त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती.

मराठवाड्यात कन्नड येथील मनसेचे एकमेव आमदार हर्षवर्धन जाधव यांची नाराजी अचानक सोडचिठ्ठीवर येऊन ठेपली. मनसेच्या नेत्यांनी आपल्याला धोका दिला असा आरोप जाधव यांनी केला आहे. त्यामुळे जि.परिषदेत शिवसेनेला पाठिंबा मिळावा असा आग्रह धरणारे जाधव आता शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता निर्माण झाली होती. जिल्हापरिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनसेनं अगोदर शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता होती मात्र ऐनवेळी निर्णय बदलून मनसेनं आघाडीला पाठिंबा दिला. पक्षाच्या या निर्णयावर जाधव यांनी उघड-उघड नाराजी व्यक्त केली. कालच या प्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाधव यांनी भेट घेतली. जवळपास तासभर राज ठाकरे यांच्याशी चर्चाही झाली. हर्षवर्धन जाधव यांनी आपली नाराजीही बोलावून दाखवली. तर औरंगाबादचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांनी जाधव यांच्या पाठिशी आम्ही कायम आहोत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जाधव आमच्या संपर्कात असल्याचा दावाही केला. तसेच जो काही निर्णय घ्यायाचा आहे तो जाधव यांचा प्रश्न आहे असंही दानवे यांनी स्पष्ट केलं. आता खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यामुळे जाधव यांनी सध्यातरी तलवार म्यान केली आहे. उद्या जाधव राज यांची भेट घेणार आहे.

close