चोरीसाठी पोलिसांचाच हातभार

April 3, 2012 9:17 AM0 commentsViews: 1

03 एप्रिल

पोलिसांच्या गाडी मधून आलेल्या माणसाने पोलिसांच्याच मदतीने एक दुचाकी चोरुन नेण्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली आहे. या घटनेचं सीसीटिव्ही फुटेज उपलब्ध झाल्यामुळे ही बाब उघडकीला आली आहे. पुण्यातल्या कोथरुड मधल्या तन्मयपुरी या सोसायटी मध्ये अनेक दुचाकी वाहनं पार्क केलेली होती. पहाटे चार वाजताच्या सुमारास इथे एक पोलिसांची जीप आली. त्यानंतर या जीप मधून दोन पोलीस एका माणसाबरोबर उतरले. यानंतर ते गाड्यांजवळ पाहणी करुन पुन्हा बाहेर गेले. गाडीमधून एका बेड्या घातलेल्या माणसाला घेऊन आले.

यानंतर काही चर्चा केल्यानंतर पुन्हा ही सगळी माणसं बाहेरच्या बाजुने निघुन जातात. त्यानंतर फक्त एक माणूस येऊन गाडी उचलून बाहेर पडतोय.. आणि त्याला एकट्याला ही गाडी उचलता न आल्यामुळे एका पोलिसाच्या मदतीने ही गाडी उचलली जात असल्याचं सीसीटिव्ही फुटेज मध्ये पहायला मिळतंय. हा संपूर्ण प्रकारच संशयास्पद असल्याचा आरोप गाडीचे मालक अविनाश देशमुख यांनी केला आहे.

एकीकडे पोलिसच गाडी उचलून नेत असल्याचं चित्र पहायला मिळतंय. आणि त्यानंतर तक्रार करायला गेल्या नंतरही अंलकार पोलीस चौकीमधल्या तक्रार घेण्यासाठी तीनशे रुपये तर पंचनामा करण्यासाठी 2 हजार रुपये मागितल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. मुळात पोलिसांनी ही गाडी चोरत असल्यासारखी नेलीच का असा प्रश्न उपस्थित होत असल्याचं ऍडव्होकेट प्रभुदेसाई यांचं म्हणणं आहे. त्यामुळे नेमकी अशी सोसायटी मध्ये पार्क केलेली गाडी पोलिसांनी नेमकी उचलली तरी का ? आणि मग सोसायटी मधल्या कोणाला याविषयी माहिती का देण्यात आली नाही असे प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.

IBN लोकमतचे सवाल

पोलीस मध्यरात्री अचानक गाडी घेऊन का गेले?पोलिसांनी चोराची मदत का घेतली ?पहाटे 4 वाजता पोलिसांनी गाडी नेली आणि दुपारी 2 वाजता गाडी सापडली असं सांगण्यात आलं. याचा अर्थ काय ?तक्रार नोंदवण्यासाठी 300 रुपये का मागितले ?गाडी उचलताना सोसायटीमधल्या लोकांना का कळवलं नाही ?पोलिसांनी गाडी मालकाला कल्पना का दिली नाही ?तक्रारीसाठी 300 रुपये का मागितले ?गाडी नेण्यासाठी 1000 रुपये का मागितले ?

close