आदर्श प्रकरणी तिवारी,फाटक यांना अटक

April 3, 2012 1:11 PM0 commentsViews: 10

03 एप्रिल

आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी आज निलंबित आयएएस अधिकारी जयराज फाटक आणि माजी माहिती आयुक्त रामानंद तिवारी यांना सीबीआयने अटक केली. या दोघांना चौकशीसाठी सीबीआयच्या अधिका-यांनी सकाळी 9 वाजता सीबीआयच्या तन्ना हाऊस कार्यालयात बोलावलं. सकाळी 10 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दोघांची चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्यांनी समाधानकारक उत्तरं न दिल्याने अखेर दोघांना अटक करण्यात आली. त्यांना उद्या सीबीआयच्या विशेष कोर्टात हजर केलं जाणार आहे.

आदर्श घोटाळ्याप्रकरणी यापूर्वी सीबीआयने सात जणांना अटक झाली. त्यात सोसायटीचे को-प्रमोटर कन्हैयालाल गिडवाणी यांच्यासह आणि सनदी अधिकार्‍यांचा समावेश आहे. त्यांच्या सीबीआय कोठडीची मुदत आज संपली. त्यामुळे आज सकाळी 11 वाजता या 7 आरोपींना सेशन्स कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्यांना 17 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली.

आदर्श प्रकरणी आज अटक करण्यात आलेले जयराज फाटक हे मुंबई महापालिकेचे आयुक्तही होते आणि हायराईज कमिटीचे सदस्यही होते. त्यांच्यावर कोणते आरोप आहेत आणि त्यांचा या आदर्श घोटाळ्यात कसा सहभाग होता ते बघुया…

आदर्शच्या जागे नुसार सोसायटीला इमारत बांधण्यासाठी केवळ तीस मिटर उंची पर्यत परवानगी मिळायला हवी होती. पण जयराज फाटक हे हायराईज कमिटीचे सदस्य होते. यावेळी या कमिटीने 30 मिटर ऐवजी 90 मिटर परवानगी दिली एवढचे नव्हे तर फाटक हे पालिका आयुक्त असताना त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन आदर्शची इमारत 103 मीटर पर्यत बांधण्याची परवानगी दिली.

रामानंद तिवारी आणि जयराज फाटक या दोघा अधिकार्‍यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करुन आदर्श सोसायटीला कैक हजार स्केअर फूट एफएसआय मिळवून दिला. या बदल्यात तिवारी यांचा मुलगा ओंमकार तिवारी याला तर फाटक यांचा मुलगा कनिष्क फाटक याला आदर्श सोसायटीत फ्लट मिळाला आहे.

रामानंद तिवारी आणि जयराज फाटक यांच्याशिवायही अजून बरीच बडी नावं आहेत, ज्यांची चौकशी कधी होणार त्यांनाही अटक होणार का हे प्रश्न अजून बाकी आहेतच..

याचप्रमाणे जयराज फाटक यांच्याबरोबरच रामानंद तिवारी यांनाही आदर्श प्रकरणात अटक झालीय. त्यांचा या घोटाळ्यात काय सहभाग होता तेही बघूया..

युती सरकारच्या काळात आदर्शची फाईल बंद झाली. पण 1999 साली सत्तेवर आलेल्या काँग्रेस आघाडी सरकारने आदर्शची फाईल पुन्हा उघडली. या फायलीच्या अंतिम मंजुरीच्या आड येणार्‍या सर्व अनियमितता कायद्यातल्या उपविधींचा आधार घेऊन नियमित केल्या गेल्या. तसेच काही ठिकाणी कायद्यांचे उल्लंघन करण्याबरोबरच बनावट कागदपत्रांचा आधार घेण्यात आला. या सर्व कामात प्रमोटर्सला मोलाची साथ लाभली ती नगर विकास विभागाचे तत्कालिन प्रधान सचिव रामानंद तिवारी यांची. नगर विकास विभागाकडून फाईल क्लीअर होण्यास कुठलीही आडकाठी राहणार नाही, याची पुरेपूर काळजी रामानंद तिवारी यांनी घेतली. त्यांनीच आदर्शला इमारत विकासाची परवानगी दिली.

एवढंच नाही, तर ही जमीन सीआरझेड-1 च्या ऐवजी सीआरझेड-2 मध्ये दाखवून, तिच्यावर बांधकाम करण्यास हरकत नसल्याची टिप्पणी रामानंद तिवारी यांनीच लिहिली. आदर्शची जमीन सीआरझेड-2 मध्ये येत असल्याचं पत्र रामानंद तिवारी यांच्या विभागाचे उपसचिव पी. व्ही. देशमुख यांच्या सहीनिशी जारी झालंय. पर्यावरणाच्या परवानगीच्या रुपात नगर विकास विभागाचे पत्रच आदर्शच्या फायलीत जोडण्यात आलंय. त्यामुळेच आदर्शला पर्यावरणाची परवानगीच नाही, हे सिद्ध झालंय. या घोटाळ्याच्या सूत्रधारांना मदत केल्याची बिदागी म्हणून रामानंद तिवारी यांचा मुलगा ओंकार तिवारी आणि पी. व्ही. देशमुख यांना स्वतःला आदर्शमध्ये फ्लॅटस् मिळाले आहेत.

तर एकीकडे सीबीआयने आदर्श प्रकरणी अटकसत्र सुरू केलंय पण दुसरीकडे मात्र राज्य सरकारच्या पातळीवर या प्रकरणी कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी पक्ष आदर्श प्रकरणी चर्चा करण्याचं टाळतोय. गेल्या शुक्रवारी विरोधी पक्षांनी आदर्श घोटाळ्यासह इतर भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर विशेष चर्चा आणली होती.

पण काही काँग्रेस नेत्यांच्या समर्थक आमदारांनी या चर्चेच्या मुद्द्यांवर आक्षेप घेतला आणि चर्चा हाणून पाडली. अधिवेशनाच्या शेवटच्या सत्रात सरकार आदर्श प्रकरणी न्यायालयीन आयोगाचा अंतरिम अहवाल विधिमंडळात सादर करणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी सरकारला या विषयावर विधिमंडळात चर्चा नकोय. म्हणूनच आदर्श प्रकरणी सरकारनं घेतलेल्या भूमिकेवर संशय व्यक्त होतोय.

close