‘शुभमच्या मारेकर्‍यांना फाशी द्या’

April 2, 2012 10:13 AM0 commentsViews: 6

02 एप्रिल

शुभमच्या मारेकर्‍यांना फाशी द्यावी, ते अल्पवयीन मुळात नाहीच, त्यांना फाशीची शिक्षाच झाली पाहिजे अशी मागणी शुभमच्या आई-वडिलांनी केली. शुभमच्या आईवडिलांनी आज पत्रकार परिषद घेऊन मागणी केली. यावेळी त्यांना शोक अनावर झाला. माझ्या मुलाने काय केलं होतं त्यामुळे त्याला आपला जीव गमावावा लागला. हा खटला चालवण्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी शुभमच्या आईवडिलांनी केली. तसेच गृहमंत्री आर आर पाटील यांची भेट घेणार आहे.

काल पुण्यातल्या प्रियदर्शनी इंग्लिश मिडीयम शाळेत शिकणार्‍या शुभम शिर्केची त्याच्याच मित्रांनी हत्या केली. शुभम फक्त 15 वर्षांचा होता. या प्रकरणी पोलिसांनी शुभमचा मित्र अमित नायर यांच्यासह आणखी दोघांना संशयावरून ताब्यात घेतलंय. हे दोघंही अल्पवयीनच आहेत. क्राईम सीरिअलमध्ये दाखवलेला थरार पाहुन शुभमचं त्याच्याच मित्रांनी अपहरण केलं. आणि दिघीजवळ बोलावून् जवळच्या जंगलात नेवून त्याचा पट्‌ट्याने गळा दाबून खून केला. त्याआधी शुभमच्या वडिलांकडून त्यांनी 15 हजारांची खंडणी वसूल केली होती. तुमचा मुलगा तुम्हाला मिळेल असं त्यांनी सांगितलं. मात्र शुभम रात्रीनंतरही घरी परत न आल्यानं शेवटी वडिलांनी पोलिसांना कळवलं. मात्र खूप उशीर होऊन गेला होता दुसर्‍यादिवशी शुभमचं प्रेत पोलिसांना मिळालं. आपला 15 वर्षाचा मुलगा गमावल्यामुळे शिर्के कुटुंबावर दुखाचा डोंगरच कोसळला. मित्राने मित्राची हत्या केल्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली. आता या अल्पवयीन आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी शुभमचे कुटुंबीय आणि मित्र करीत आहे.

close