विद्यापीठाला दिलासा ; टी.वाय.बीकॉमचा पेपर 11 एप्रिलला

April 4, 2012 1:38 PM0 commentsViews: 10

04 एप्रिल

पेपरफुटीमुळे अडचणीत आलेल्या मुंबई विद्यापीठाला हायकोर्टाने दिलासा दिला आहे. 11 एप्रिलला टी.वाय.बी.कॉमच्या मार्केटिंग ऍन्ड ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंटचा पेपर पुन्हा होणार आहे. हा पेपर पुन्हा घेतला जाऊ नये अशी याचिका काही विद्यार्थ्यांनी हायकोर्टात दाखल केली होती. त्यावर कोर्टाने निर्णय देत याचिका फेटाळुन लावली.

भिवंडी येथील बीएनएन महाविद्यालयात टी.वाय.बी.कॉम.चा 'एमएचआरएम' (मार्केटिंग ऍन्ड ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट ) विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एका विद्यार्थ्यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली. या पेपरमधील 4 प्रश्नांपैकी 3 प्रश्न फुटले. याची माहिती एसएमएस ने मिळाली होती. याबद्दल खुद्द कुलगुरु राजन वेळुकर यांनीही पेपर फुटल्याचं मान्य केलं आहे. याप्रकरणी बीएनएन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डी.एस.भांगरे,वरिष्ठ पर्यवेक्षक आर.एन.देशपांडे,प्रा.जाधव यांना निलंबित करण्यात आले. तसेच 2015 पर्यंत या महाविद्यालयात परीक्षा केंद्राची मान्यताही रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, प्रकरणावरुन शिवसेनेनं कुलगुरू राजन वेळुकर यांना हटवण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे. आज हायकोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे विद्यापीठाला दिलासा मिळाला आहे. पण पेपर फुटीमुळे 85 हजार विद्यार्थ्यांना हा पेपर पुन्हा द्यावा लागणार आहे.

close