बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू

April 4, 2012 3:26 PM0 commentsViews: 18

04 एप्रिल

नाशिक जिल्ह्यातल्या शिवरे गावात बिबट्याच्या हल्ल्यात एक वर्षाच्या चिमुकल्याचा बळी गेला. पहिल्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच आईच्या कुशीतून बिबट्यानं बाळ पळवलं. वीज कनेक्शन वेळेत मिळालं असतं, वनविभागाने दखल घेतली असती तर दुर्गेश वाचला असता असा आक्रोश त्याचे पालक करताहेत. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्यांचा वावर वाढलाय. 8-10 शेळ्यांचा फडशा पाडल्यानंतरही वनविभागाने दखल घेतली नसल्याची गावकर्‍यांची तक्रार आहे.

निफाड तालुक्यातल्या शिवरे गावात गोसावींच्या घरी खरं तर आज दुर्गेशच्या वाढदिवसाचा आनंद असता. पण या घरात आज आक्रोश आहे. दुर्गेशच्या मृत्यूचा. उसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने आईच्या पुढ्यातून दुर्गेशला पळवून नेलं.

खरं तर बिबट्या मानव संघर्षातले इतर मुद्दे इथेही आहेत, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे तो दुर्गेशच्या वडीलांनी अर्ज करून, पैसे भरून वीज कंपनीनं लाईट न दिल्याचा. लाईट असते तर आपला मुलगा जगला असता अशी यांची तक्रार आहे.

वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला, पण बिबट्याच्या हल्ल्यात दुर्गेेशचा जीव गेला. याआधी शिवरे गावातल्या 8 -10 शेळ्या बिबट्याने फस्त केल्यात. बिबट्याने दुर्गेशला पळवल्यानंतरही वनविभागाचे कर्मचारी पोहोचले तब्बल 2 तासांनी. दुर्गेश तर जीवानिशी गेला. पण त्याच्या मावशीच्या प्रश्नांची उत्तरं कोण देणार ? उसाच्या उघड्या शेतात बिबट्याला रोखणं कठीण आहे, पण बिबट्या आणि माणसांच्या या संघर्षात माणसांचे बळी जाणं केव्हा थांबणार ?

close