जानेवारीत लष्कराने केले होते चलो दिल्ली ?

April 4, 2012 10:48 AM0 commentsViews: 6

04 एप्रिल

लष्करप्रमुख आणि सरकारमधला संघर्ष सध्या गाजत असताना आता आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली. सोळा आणि सतरा जानेवारीच्या रात्री लष्कराच्या दोन तुकड्या दिल्लीकडे रवाना झाल्या होत्या. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राने आज ही बातमी दिली. लष्करी तुकड्यांच्या या हालचालीची माहिती संरक्षण मंत्रालयाला नव्हती, असा दावाही या वृत्तपत्रात करण्यात आला आहे.

गेली अनेक वर्षं युद्ध किंवा युद्धाचं सावट नसल्यानं दिल्ली शांत आहे. 16 जानेवारीची मध्यरात्र.. हरियाणातल्या हिसरमधून 33 वी आर्मर्ड डिव्हिजन दिल्लीच्या दिशेने निघाली. त्याच वेळी.. आग्रा येथील पारस या 50 पॅरा ब्रिगेडनंही राजधानीकडे कूच केलं.आणि ही हालचाल सरकारला न कळवता करण्यात आली.

लष्करप्रमुख आणि सरकारमधील संबंध ताणले गेले असतानाच.. या घटना घडल्यानं.. संशयाचं वातावरण निर्माण झालं. सरकारच्या गुप्तचर संस्थांना याचा सुगावा लागला. त्यांनी भल्या पहाटे संरक्षण मंत्र्यांना आणि ताबडतोब पंतप्रधानांना ही माहिती दिली. मलेशियाच्या दौर्‍यावर असणार्‍या संरक्षण सचिव शशिकांत शर्मांना दौरा सोडून परतण्याचे आदेश देण्यात आले.

संरक्षण मंत्रालयाने खबरदारीचा उपाय म्हणून अतिरेकी इशारा जारी केला. आणि दिल्लीकडे येणार्‍या सर्व वाहनांची कसून चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यामुळे रस्ते जॅम झाले. आणि दिल्लीपर्यंत पोचणं लष्करी वाहनांसाठी कठीण होऊन बसलं.

पण पहाट होईपर्यंत.. 33 आर्मर्ड डिव्हिजन पश्चिम दिल्लीजवळच्या बहादूरगडपर्यंत येऊन थांबली. तर पारस डिव्हिजन, दिल्ली विमानतळाजवळच्या पालमजवळ येऊन थबकली. 11 आठवड्यांनंतर इंडियन एक्सप्रेसने ही खळबळजनक बातमी दिली. पण ही हालचाल म्हणजे नियमित सराव आहे, असा दावा लष्कराने केला.लष्कराचं स्पष्टीकरण

'हा नियमित सरावाचा भाग होता. धुक्याच्या वेळेला कारवाई करण्याची लष्कराची सिद्धता तपासण्यासाठी हे ड्रिल करण्यात आलं. दिल्लीच्या दिशेने येणंच योग्य होतं. पश्चिमेच्या दिशेनं पाकिस्तान असल्याने तिकडे जाणं अयोग्य होतं.'

संरक्षण मंत्र्यांनी इंडियन एक्सप्रेच्या बातमीत तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. जेव्हा ही घटना घडली, त्याच दिवशी.. लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनी जन्मतारखेच्या वादावरून सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. टाट्रा खरेदी प्रकरणी, लष्करातल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजत असतानाच इंडियन एक्सप्रेसच्या या बातमीने अनेक प्रश्न निर्माण केलेत. सरकार आणि लष्करानं स्पष्टिकरण दिलं असलं तरी काही प्रश्न अनुत्तरीत राहतात.

आयबीएन लोकमतचे सवाल

- सैन्य तुकड्यांचा हा सराव नेहमीच करण्यात येतो का ?- सराव करताना संरक्षण मंत्रालयाला पूर्वकल्पना देण्यात आली नाही का ?- हा नियमित सराव असेल तर संरक्षण सचिवांना मलेशिया दौरा अर्ध्यात का सोडावा लागला ?- वायुदलाला सरावाची माहिती देण्यात आली होती का ?- जर लष्करी तुकड्यांनी नियमांचं उल्लंघन केलं असेल तर कोणती कारवाई करण्यात आली ?- या घटनेवर सरकारनं 11 आठवड्यांपर्यंत काहीच स्पष्टीकरण का दिलं नाही ?- लष्करप्रमुखांचं सरकारविरोधात कोर्टात जाणं आणि या घटनेचा काही संबंध आहे का ?

close