राज्यात ‘पाणी’बाणीची परिस्थिती

April 4, 2012 4:48 PM0 commentsViews: 26

04 एप्रिल

डोक्यावर कडक ऊन, पाणी नसल्याने सुकत चाललेली शेती, कोरड्या झालेल्या विहिरी आणि त्यातंच जमिनीतील पाणी साठा आटल्याने निकामी झालेल्या बोअरवेल्स, जमिनीतील पाण्याची खालावलेली पातळी यानं जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जळगावाचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या मतदारसंघात तर गावकर्‍यांना पाण्यासाठी चक्क 5 किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागतेय. ममुराबाद गावात तर या पाणीटंचाईने गावकरी हवालदील झाले आहे.

गावाला पाणीपुरवठा करणारी योजना मंजूर होऊन अनेक वर्ष लोटली. पण ही योजना राजकारण्यांचा बळी ठरल्यानं गावकर्‍यांचे अतोनात हाल होत आहे.मागणी करुनही गावात पाण्याचे टँकर प्रशासनाकडून मिळत नसल्याने गावक-यांचे हाल काही कमी व्हायला तयार नाही. जिल्हा परीषद आणि प्रशासन या दोघांनी तातडीने पाण्याचे टँकर सुरु करावे या मागणीसाठी गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

सरपंच, ग्रामसेवकांना कार्यालयात कोंडले

पाणी टंचाईमुळे संतप्त गावकर्‍यांनी ग्रामपंचायतीच्या सदस्यांना, सरपंचांना आणि ग्रामसेवकांना पंचायतीच्या कार्यालयातच कोंडून ठेवल्याचा प्रकार नाशिकमध्ये झाला. नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव तालुक्यातल्या जोंधळवाडीची ही घटना आहे. गेल्या 2 महिन्यांपासून या गावात पाण्याची कमतरता आहे. या गावासाठी सरकारच्या 2 पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्यात. मात्र, दोन्हीही फक्त कागदावरच असल्यानं गावकर्‍याच्या संतापाचा उद्रेक झाला. शेवटी पोलिसांनी येऊन यांची सोडवणूक केली.

उस्मानाबादेत पाण्यासाठी भटकंती

उस्मानाबाद जिल्ह्यात पाणीटंचाईचं संकट जाणवू लागलंय. पाणी टंचाईमुळे पाण्यासाठी कोसोमिल भटकंती सुरू आहे. मराठवाड्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे पाणीटंचाईचं संकट जाणवू लागलंय. जिल्ह्यात यंदा 770 मीमी पाऊस अपेक्षित होता मात्र केवळ 521 मीमी पर्जन्यमान झालंय. पाणीटंचाईचा मुख्य फटका उस्मानाबाद शहराला बसत असून शहरात उन्हाळ्याच्या सुरूवातीपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

close