तिवारींच्या हातात विलासराव,अशोकरावांची विकेट ?

April 4, 2012 5:01 PM0 commentsViews: 5

04 एप्रिल

आदर्श प्रकरणी अटकेत असलेले रामानंद तिवारी यांच्या चौकशीनंतर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण आणखीनच अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे सीबीआय समोर तिवारी काय जबाब नोंदवतात यावर बरच काही अवलंबून आहे.

नगर विकास खात्याचे प्रमुखपद वर्षानुवर्षे सांभाळणार्‍या रामानंद तिवारींच्या डोळ्यादेखत आदर्श घोटाळा घडला. त्यामुळे तिवारींना सीबीआयने अटक केली. पण याआधीच रामानंद तिवारींनी न्यायालयीन आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्यावरील आरोप नाकारताना महत्वाच्या परवानग्यांसाठी विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाणांना जबाबदार धरलंय.

विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळामध्ये महसूल मंत्री असताना अशोक चव्हाणांनीच आदर्शच्या वाढीव एफएसआयसाठी काम केल्याचा आरोप रामानंद तिवारींनी प्रतिज्ञापत्रात केला.

बेस्टचा भूखंड आदर्शला बहाल करून वाढीव एफएसआय वापरु देण्याची विनंती अशोक चव्हाणांनी केली. या विनंतीपत्राला विलासरावांनी मान्यता दिल्यानंतरच बेस्टच्या भूखंडाचं आरक्षण बदललं गेलं. आणि आदर्श सोसायटीला वाढीव एफएसआय दिला गेला. असं रामानंद तिवारींनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

याचाच अर्थ आदर्शला बेस्टचा भूखंड आणि त्यामाध्यमातून वाढीव एफएसआय मिळवून देण्याचे खापर रामानंद तिवारींनी अशोक चव्हाण आणि विलासरावांवर फोडलं. आता सीबीआयसमोर रामानंद तिवारींनी आपल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणेच जबाब नोंदवला तर विलासराव आणि अशोक चव्हाण सीबीआयच्या जाळ्यात अडकू शकतात. प्रदीप व्यास, रामानंद तिवारी आणि जयराज फाटक यांच्यापाठोपाठ विलासराव देशमुखांचे तत्कालीन प्रधान सचिव सुभाष लाला यांनाही अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच नोकरशाहीतले बडे हे मासे अडकल्यानंतर आपसुकच राजकीय डोहातले बडे मासेसद्धा सीबीआयच्या जाळ्यात अडकतील असं बोललं जातंय.

रामानंद तिवारींचं प्रतिज्ञापत्र

''बेस्टचा भूखंड आदर्शला बहाल करून वाढीव एफएसआय वापरू देण्याची विनंती अशोक चव्हाणांनी केली. या विनंतीपत्राला विलासरावांनी मान्यता दिल्यानंतरच बेस्टच्या भूखंडाचं आरक्षण बदललं गेलं आणि आदर्श सोसायटीला वाढीव एफएसआय दिला गेला.''

close