कोलकाता, दिल्ली आज आमने-सामने

April 5, 2012 11:32 AM0 commentsViews: 1

05 एप्रिल

भारतीय टीममधील ओपनर आणि दिल्लीचे दोन धडाकेबाज बॅट्समन आज आमने सामने येणार आहेत. कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स या दोन्ही टीम नव्या हंगामातल्या पहिल्या विजयासाठी सज्ज झाल्या आहेत.

आपल्याला जिंकायचंय ही भावना या खेळाडूंमध्ये कायम आहे. दिल्ली डेअर डेव्हिल्स टीमसाठी आयपीएलमधला आतापर्यंतचा आलेख उतरता राहिला. या ही वेळी टीममध्ये फारशी मोठी नावं नाहीत. पण टीमचा होमवर्क तयार आहे. मोठ्या खेळाडूंच्या नसण्यामुळे टीमची ताकदही बरीच कमी झाली आहे. पण टीमचा कॅप्टन मात्र पूर्वी होता तसाच आहे.आत्मविश्वासाने भरलेला…

कॅप्टन वीरेंद्र सेहवाग, डेव्हिड वॉर्नर, आणि महेला जयवर्धनेवर दिल्लीच्या बॅटिंगची मदार असेल. दुखापतग्रस्त रॉस टेलर टीममध्ये परतल्यावर दिल्लीची बॅटिंग अधिकच मजबूत होईल. तर मॉर्न मॉर्केल दिल्लीचा प्रमुख बॉलर असेल. पहिले तीन हंगाम राजस्थान रॉयलकडून खेळणारा मॉर्केल आता दिल्लीचा प्रमुख बॉलर बनला आहे. गेल्या हंगामात मॉर्केलनं तब्बल 13 विकेट घेतल्यात.

दुसरीकडे शाहरुख खानच्या मालकीची कोलकाता नाईट रायडर्स गेल्या चार हंगामात बाद फेरीही गाठू शकलेली नाही. पण यंदा गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता टीम हे अपयश पुसून काढण्यास सज्ज झाली आहे. गौतम गंभीरच्या जोडीला धडाकेबाज बॅट्समन युसुफ पठाण, ऑलराऊंडर जॅक कॅलिस आणि फास्ट बॉलर ब्रेट ली विजयी सलामी देण्यासाठी तयार आहेत.

गौतम गंभीरने नाईट रायडर्सचं नेतृत्व सांभाळल्यानंतर टीमची गाडी वेगाने पळतेय. गेल्या हंगामात टीमने चौथ्या स्थानावर धडक मारली होती. पण यंदा त्यांना इथंच थांबायचं नाही, फायनल गाठण्याचा निर्धार टीमने केला आहे. त्यातच मॅच घरच्या मैदानावर होणार असल्याने नाईट रायडर्सला प्रेक्षकांचा पाठिंबाही मिळणार आहे. या मॅचमध्ये सध्यातरी कोलकाता नाईट रायडर्सचं पारडं जड वाटत असलं तरी सेहवागची दिल्ली डेअरडेव्हिल्स टीम आव्हान द्यायला सज्ज झाली आहे. त्यामुळे ही मॅच चुरशीची होणार हे नक्की.

close