भुजबळांच्या ‘एमईटी’ची शनिवारी झाडाझडती

April 5, 2012 5:40 PM0 commentsViews: 8

05 एप्रिल

छगन भुजबळ हे अध्यक्ष असलेल्या मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या चौकशीचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता असिस्टंट चॅरिटी कमिशनर यांनी एमईटीच्या आठव्या आणि दहाव्या मजल्याची पाहणी करुन व्हिडिओ शुटिंग करुन, तसेच फोटो काढून अहवाल द्यावा असे आदेश दिले आहेत. छगन भुजबळ यांच्यावर त्यांचेच सहकारी सुनील कर्वे यांनी 179 कोटींच्या अपहाराचा आरोप केला. ट्रस्टच्या दोन मजल्यांचा गैरवापर होत असल्याची तक्रारही त्यांनी चॅरिटी कमिशनरकडे दाखल केली होती. आणि आता तब्बल दोन महिन्यांनंतर चॅरिटी कमिशनरनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे.

रातोरात फर्निचरच दुकान घरी पळवलं !

एमईटी च्या आठव्या मजल्यावर छगन भुजबळ यांच्या सुनांची इडनीन फर्निचर ही कंपनी कशी चालवली जात होती.आणि तक्रारीनंतर रातोरात तिथलं सामान सांताक्रूझ इथल्या कॉन्व्हेंट ऍव्हेन्यू रोडवरच्या छगन भुजबळ यांच्या बहुमजली बंगल्यामध्ये कसं नेण्यात आलं. पुरावे नष्ट करण्याचं हे कारस्थान इथचं थांबलं नाही. असिस्टंट चॅरिटी कमिशनरने इथं येऊन चौकशी करण्याआधीच त्यांनी अख्ख्या मजल्यावर नवं बांधकाम सुरु केलंय.

शनिवारी सकाळी असिस्टंट चॅरिटी कमिशनर एमईटीमध्ये चौकशी करण्यासाठी येणार आहेत. फोटोग्राफी आणि व्हिडिओ शुटिंग करुन त्याबद्दलचा अहवाल सादर करणार आहेत.चॅरिटी कमिशनरनी चौकशीचे आदेश चार एप्रिलला दिले आणि त्याच मध्यरात्री मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट या शैक्षणिक इमारतीत हे बांधकाम सुरु झालं.

गुरुवारचा अख्खा दिवस हे काम अखंडपणे सुरुच होतं. सिमेंटच्या गोण्या…डेब्रीचे ट्रक्स….रंगकाम करणारे रंगारी….ही सगळी दृष्य आम्ही मुष्कीलीनं मिळवली. कारण, शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या या इमारतीभोवती आता गुंडांचा कडक पहाराही ठेवण्यात आला. इतकचं नाही तर ट्रस्टमधला गैरव्यवहार बाहेर काढल्याचा वचपा म्हणून छगन भुजबळ यांनी चक्क सुनील कर्वे यांनाच एमईटीमध्ये प्रवेशाला बंदी घातलेय.

या सर्वात धक्कादायक म्हणजे पोलिसांनी घेतलेली बोटचेपी भूमिका. इकॉनॉमिक ऑफेन्स विंगने चक्क लेखी कबुली दिलीय की, तुमची तक्रार आम्ही नोंदवूनही घेतली नाही.

भुजबळांनी पोलिसांमध्ये राष्ट्रवादीचं वजन वापरलं. पण चॅरिटी कमिशनरने आपला बडगा उगारला. भुजबळांचं गेस्ट हाऊस असलेल्या 'एमईटी'च्या दहाव्या मजल्याचा आणि फॅमिली बिझनेस सेंटर असलेल्या आठव्या मजल्याचा वापर फक्त शैक्षणिक कारणांसाठीच करावा, असे हंगामी आदेशच देण्यात आले आहे. एमईटीची उर्वरित लढाई आता रंगणारेय ती मुंबई हायकोर्टात.

close