योजनांना पैसा फुल्ल, नळाचे पाणी गुल !

April 9, 2012 11:10 AM0 commentsViews: 3

शशी केवडकर, बीड

09 एप्रिल

बीड जिल्ह्यातसुध्दा सध्या पाणी टंचाई, चारा टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. जिल्ह्यातील तलाव, मोठी धरणं कोरडी पडतायत. माजलगाव धरणाची पाणी पातळी खालावली आहे. गावात तीन तीन योजना मंजूर झाल्या त्यांची बिल ही गेली पण गावात पाणीच गुल झाले आहे. पण प्रशासनाला मात्र कुठेही दुष्काळ दिसत नाही.

बीड जिल्ह्यातल्या पाटोदा गावात जीवन प्राधिकरण,जलस्वराज्य, पूरक पाणीपुरवठा अशा तीन तीन योजना या भागात मंजूर झाल्या. या योजनेचं बिलसुद्धा संबधीत एजन्सीला देण्यात आली, पण या भागात अजूनही पाण्याचा थेंब सुध्दा आला नाही.

या भागात जिल्हा परिषदेचं मतदान होईपर्यत दिवसातून दोन वेळेला पाणी सोडण्यात आलं होतं. पण मतदानानंतर दुसर्‍याच दिवशी पाणी बंद झालं. एवढंच नाही तर गावकर्‍यांना पाण्याचे टँकर मागवण्याचा सल्लाही देण्यात आला. पाटोदा इथल्या तीन विविध पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यात याव्या, असे आदेशही कोर्टाने दिले. पण कोर्टाचे आदेशही धाब्यावर बसवण्यात आले.

जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा बसताना सरकारने शेतकर्‍याची वीज बिलं, पाणी पुरवठ्याची बिलं सरकारने माफ करावी, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.

close