राणेंचा विरोधकांवर प्रहार

April 9, 2012 2:12 PM0 commentsViews: 22

09 एप्रिल

फुटलेल्या कॅगच्या अहवालामध्ये ऑडिटरचे आक्षेप म्हणजे भ्रष्टाचार नव्हे असं समर्थन करत नारायण राणे यांनी विरोधकांवर प्रहार केला. विरोधकांपैकी एकनाथ खडसे, पांडुरंग फुंडकर, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत बावनकुळे, शारदा गिरी चौधरी यांनीदेखील सरकारकडून माफक दरात भूखंड घेतले आहेत असा आरोप राणे यांनी केला. राणे यांच्या आरोपाने संतप्त झालेल्या देवेद्र फडणवीस यांनी केलेले आरोप मागे घ्या नाहीतर सिद्ध करून दाखवा अन्यथा तुमच्यावर विधानसभेत हक्कभंग आणू असं आव्हान राणेंना दिलं.

मागिल आठवड्यात 4 एप्रिलला कॅगचा अहवाल फुटल्यामुळे राज्याला एकच हादरा बसला. राज्यातील 10 आजी-माजी मंत्र्यांवर या अहवालात ठपका ठेवण्यात आला. मंत्र्यांनी आपल्या कार्यकाळात पदाचा गैरवापर करत अनेक सरकारी जमीन कवडीमोल दरात लाटल्याचं उघड झालं. यामुळे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उद्योगमंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, वनमंत्री पतंगराव कदम यांच्यावर ठपका ठेवण्यात आला.

मंत्र्यांनी आपल्या नातेवाईकांना आणि संस्थांना कवडीमोल भावात जमिनी दिल्याचं या अहवालात असल्याचं असा आरोप भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस यांनी या अहवालाची एक सिडी विधानसभा अध्यक्षांकडे जमा केली. यामध्ये नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाला समाजभवनासाठी 1 हजार 719 स्क्वे. मीटर जागा मिळाली. मात्र जागेवर बँकेट हॉल आणि बार सुरू केला असा आरोप करण्यात आला.

आज विधानसभेत नारायण राणे यांनी विरोधकांना धारेवर धरत प्रहार केला. विरोधकांपैकी एकनाथ खडसे, पांडुरंग फुंडकर, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत बावनकुळे, शारदा गिरी चौधरी यांनीदेखील सरकारकडून माफक दरात भूखंड घेतले आहेत असा आरोप राणे यांनी केला. तसेच फुटलेल्या कॅगच्या अहवालामध्ये ऑडिटरचे आक्षेप म्हणजे भ्रष्टाचार नव्हे असं समर्थनही राणे यांनी केलं. राणे यांच्या आरोपांमुळे विरोधक संतप्त झाले आणि त्या गोंधळामुळे विधानपरिषदेचं कामकाज काही काळ तहकुब करण्यात आलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना आमदार देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंना आव्हान दिलंय. केलेले आरोप मागे घ्या नाहीतर सिद्ध करून दाखवा अन्यथा तुमच्यावर विधानसभेत हक्कभंग आणू असं देवेंद्र फडणवीस यांनी राणेंना आव्हान दिलं. फुटलेल्या अहवालाची दखल घेत 16 एप्रिलला विधानसभेत सादर केला जाईल अस जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे जसेजसे दिवस जवळ येत आहे तसेतसे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडायला सुरवात झाली आहे.

close