भूकंपानं हादरलं इंडोनेशिया;मुंबईत सौम्य धक्के

April 11, 2012 9:33 AM0 commentsViews: 14

11 एप्रिल

इंडोनेशियाजवळ हिंदी महासागरात आज 8.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. आणि जगभरात तब्बल 28 देशांमध्ये सुनामीचा इशारा जारी करण्यात आला. 2004 च्या सुनामीच्या आठवणीमुळे इंडोनेशियासह भारताच्या किनारपट्टीच्या भागात भीतीची लाट पसरली. पण सुदैवाने या भूकंपात फारसं नुकसान झालं नाही.

आज बुधवार, 11 एप्रिल, दुपारची वेळ..इंडोनेशियाची भूमी हादरली..रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता होती 8.6 भूकंपाचं केंद्र होतं. असेह प्रांतात समुद्राखाली 16 किलोमीटरवर.

100 वर्षांतला हा आठवा सगळ्यात मोठा भूकंप…पण सुदैवानं यात फारसं नुकसान झालं नाही. हा भाग भूकंपप्रवण असल्याने इथे खबरदारी नेहमीच घेतली जाते. पण भीती होती ती सुनामीची. कारण 2004 च्या सुनामीच्या वेळीही भूकंपाचा केंद्रबिंदू इथेच होता. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली.. ही धावाधाव सुरू असतानाच इंडोनेशियाला भूकंपाचा दुसरा धक्का बसला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर होती 8.2 इतकी.जगभरातल्या 28 देशांमध्ये सुनामीचा इशारा जारी करण्यात आला. भारताच्या समुद्र किनार्‍यावरही सुनामीचा इशारा देण्यात आला होता. पण, संध्याकाळपर्यंत तो मागे घेतला गेला. मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, पाटणा, तिरुवनंतपुरम आणि निकोबार या ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. कोलकात्यामध्ये तर इमारतींना तडे गेले.. आणि मेट्रो सेवाही काही वेळ थांबवण्यात आली.

यापूर्वी इंडोनेशियामध्ये 11 जानेवारीला पहाटे भूकंपाचा जोरदार झटका बसला होता. त्या भूकंपाची रिश्टर स्केलवर 7.3 इतकी तीव्रता मोजण्यात आली होती. तेव्हा भूकंपाचा केंद्रबिंदू बादा अचेह शहरापासून 420 किलोमीटर अंतरावर होता. 2004 मध्ये हिंदी महासागरात त्सुनामीमुळे संपूर्ण इंडोनेशियात किमान 2 लाख 30 हजार लोक मारले गेले होते. आज दुपारी बसलेला भूकंपाचा केंद्रबिंदू याच ठिकाणावरून असल्याचा अमेरिकेतील भूकंप मापन केंद्राचं म्हणणं आहे. समुद्रात 33 किलोमिटर खोल भूकंपाचे धक्के जाणवले आहे. पण या वेळी फक्त उंच लाटा येतील, अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

close