फडणवीसांची चौकशी होणार -गृहमंत्री

April 12, 2012 11:50 AM0 commentsViews: 2

12 एप्रिल

कॅगचा अहवाल येत्या सोमवारी विधिमंडळात सादर होणार आहे. त्यामुळे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालाला जोरदार विरोध झाला. छगन भुजबळ यांनी तर हा अहवाल चुकीचा आहे, असं म्हणत अमान्य केला. हा अहवाल बाहेर आणणार्‍या देवेंद्र फडणवीसांची आता सरकार चौकशीही करणार आहे.

कॅगच्या अहवालामुळे आधी केंद्राचं सरकार अडचणीत आलं. आणि आता तीच पाळी राज्य सरकारवर आली आहे. कॅगने राज्यातल्या दहा बड्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला. हा अहवाल भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केला. त्यामुळे सरकारचे धाबे दणाणले. आधी अहवाल सादर होऊ द्या, मग बोलू.. असं वेळ मारून देणारं उत्तर मंत्र्यांनी दिलं. पण कॅगच्या निष्कर्षांवर खुद्द शरद पवारांनी टीका केल्यानंतर मात्र आता अनेक मंत्र्यांना वाचा फुटली.

गृहमंत्री आर आर पाटील यांनी भुजबळांच्या पुढे एक पाऊल टाकलं. अहवाल फोडणार्‍या फडणवीसांवर कारवाई करू, असं त्यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना जाहीर केलं. तर मी कोणत्याही चौकशी साठी तयार आहे. पण आधी अहवालाच्या निष्कर्षांची चौकशी करा, असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं.

येत्या सोमवारी.. म्हणजेच 16 तारखेला कॅगचा अहवाल विधिमंडळात सादर होईल. तेव्हा केंद्रात झाला होता. तसा राज्यातही होईल का ? हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

close