सुनामीचा धोका टळला

April 11, 2012 1:03 PM0 commentsViews: 6

11 एप्रिल

इंडोनेशियातल्या भूकंपानंतर 28 देशांमध्ये सुनामीच्या सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह देशातल्या अनेक शहरांत भूकंपाचे सौम्य धक्के बसलेत. कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, पाटणाला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पण भारतात सुनामीची शक्यता नसल्याचे हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे. सतर्कतेचा इशारा म्हणून मच्छिमारांना समुद्रातून परत बोलावण्यात आलं आहे.

इंडोनेशियाजवळ हिंदी महासागरात आज 8.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. आणि जगभरात तब्बल 28 देशांमध्ये सुनामीचा इशारा जारी करण्यात आला. 2004 च्या सुनामीच्या आठवणीमुळे इंडोनेशियासह भारताच्या किनारपट्टीच्या भागात भीतीची लाट पसरली. पण सुदैवाने या भूकंपात फारसं नुकसान झालं नाही. आज बुधवार, 11 एप्रिल, दुपारची वेळ..इंडोनेशियाची भूमी हादरली..रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता होती 8.6 भूकंपाचं केंद्र होतं. असेह प्रांतात समुद्राखाली 16 किलोमीटरवर.

100 वर्षांतला हा आठवा सगळ्यात मोठा भूकंप…पण सुदैवानं यात फारसं नुकसान झालं नाही. हा भाग भूकंपप्रवण असल्याने इथे खबरदारी नेहमीच घेतली जाते. पण भीती होती ती सुनामीची. कारण 2004 च्या सुनामीच्या वेळीही भूकंपाचा केंद्रबिंदू इथेच होता. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली.. ही धावाधाव सुरू असतानाच इंडोनेशियाला भूकंपाचा दुसरा धक्का बसला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर होती 8.2 इतकी.जगभरातल्या 28 देशांमध्ये सुनामीचा इशारा जारी करण्यात आला. भारताच्या समुद्र किनार्‍यावरही सुनामीचा इशारा देण्यात आला होता. पण, संध्याकाळपर्यंत तो मागे घेतला गेला. मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, पाटणा, तिरुवनंतपुरम आणि निकोबार या ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. कोलकात्यामध्ये तर इमारतींना तडे गेले.. आणि मेट्रो सेवाही काही वेळ थांबवण्यात आली.

26 डिसेंबर 2004 च्या दिवशी इंडोनेशियात आलेल्या सुनामीमुळे 2 लाख 30 हजार लोकांचा बळी गेला होता. पण या वेळी फक्त उंच लाटा येतील, अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

close