चिमुकल्या आफरीनने घेतला जगाचा निरोप

April 11, 2012 2:11 PM0 commentsViews: 18

11 एप्रिल

दिल्लीतल्या बेबी फलकची बातमी विस्मृतीत जाते न जाते तोच आणखी एक चिमुकली तशाच प्रकारच्या अत्याचाराला बळी पडली आहे. वडिलांनी केलेल्या मारहाणीत जबर जखमी झालेल्या 3 महिन्यांच्या आफरीनचा आज मृत्यू झाला. बंगळुरुच्या या अमानुष घटनेचा देशभरातून निषेध होतोय.

गेल्या चार दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणार्‍या चिमुकल्या आफरीनने अखेर या जगाचा निरोप घेतला. जन्मदात्या पित्यानंच केलेल्या अमानुष मारहाणीमुळे आफरीनला गेल्या रविवारी बंगळुरुच्या वाणी विलास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. डोक्याला मार बसल्यामुळे ती कोमात होती. तिच्या डोक्यात रक्तस्त्राव होत होता. आफरीनला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न करण्यात आले. पण बुधवारी सकाळी तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच. या 3 महिन्याच्या निष्पाप मुलीची प्राणज्योत मालवली.

जेमतेम 3 महिन्यांपुर्वी आफरीन या जगात आली. तिचं नितांत सुंदर रुप बघून तिच्या आईनं तिचं नाव अप्रतिम सुंदर म्हणजेच आफरीन ठेवलं. पण तिचे वडिल उमर फारुकला मुलगा हवा होता. आफरीनचा जन्म झाल्यापासूनच तो तिचा द्वेष करायचा. गेल्या रविवारी तर कळसच झाला. त्याने तिच्या कपाळावर सिगरेटचे चटके दिले, तिला भयंकर मारझोड केली. त्यात आफरीनची मान मोडली. डोक्याला जबर झटका बसला. या नराधमाला अटक करण्यात आली. त्याला कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी आफरीनच्या आईने केलीय.

आफरीनच्या बापाल शिक्षा होईलही… पण मुलाच्या अट्टहासापायी.. मुलीचा बळी घेण्याच्या प्रकारांना आळा कधी बसणार ? स्त्री-पुरुष समानतेची चळवळ सुरु होऊन आता तब्बल दोन शतकं होत आली. पण मुलगी नको.. ही मानसिकता बदलायला अजून किती शतकं लागणार आहेत ? या प्रश्नांची उत्तर कुणाकडेही नाहीत.

close