राष्ट्रवादीची पिछाडी, काँग्रेसची आघाडी

April 16, 2012 1:45 PM0 commentsViews: 4

16 एप्रिल

अलीकडेच झालेल्या 10 महापालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत पराभवाला सामोरं गेलेल्या काँग्रेस पक्षाने पाच महापालिकांमध्ये चार ठिकाणी सर्वाधिक जागा जिंकत बाजी मारली आहे. आपल्याच घरातल्या भिडूला चार पालिकेत चांगलाच 'हात'दाखवत काँग्रेसने मैदान मारले आहे. याची सुरुवात केली विलासराव देशमुख यांच्या लातूरपासून. लातुरात सर्वाधिक 49 जागा जिंकत खणखणीत बहुमत सिध्द करुन दाखवलं. लातूरकर इतरांना कधीही भारी पडतील असा टोलाही विलासरावांनी विजयानंतर लगावला. पाच पालिकेत या विजयामुळे काँग्रेसमध्ये 'गारवा' जाणवायला लागला आहे.

लातूरमध्ये देशमुखांनी गड राखला

विलासरावांच्या लातूरमध्ये पहिल्या वहिल्या महापालिकेच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवत काँग्रेसनं सत्ता काबीज केली. या पालिकेत विलासरावांना विजय मिळवणे तसे पाहिले तर ते सोपेच होते. कारण विलासरावांसाठी हे होम ग्राऊंड असल्यामुळे काँग्रेसचा विजय होणे हे अपेक्षितच होते. पण सर्वाधिक 49 जागा जिंकून अमित देशमुख यांनी मोठा करिश्मा घडवला. विलासराव देशमुख यांनी आयबीएन लोकमतशी बोलतांना लातूरकरांचे आभार मानले हा लातूरच्या विकासासाठी आणखी कामं करणार अशी ग्वाही दिली. तसेच या विजयाचे शिल्पकार अमित देशमुख आहे आणि या विजयाचे श्रेय सगळ्या कार्यकर्त्यांना दिले. लातुरात राष्ट्रवादीला 13 जागांवर समाधान मानावे लागले तर शिवसेनेला 6 आणि रिपाइंला 2 जागा मिळाल्यात तर दुसरीकडे सर्व जागांवर लढणार्‍या मनसे आणि भाजपला भोपळा सुध्दा फोडता आला नाही.

एकूण जागा: 70 जागाबहुमतासाठी: 36 जागाकाँग्रेस 49 जागाराष्ट्रवादीला 13 जागाशिवसेनेला 6 जागाआरपीआय 2 जागा

परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर ?

लातूरपासून काही किलोमिटर अंतरावर असलेल्या परभणीतही पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक झाली. इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर बसण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादील बहुमतासाठी केवळ 3 जागांची गरज आहे. काँग्रेसलाही चांगल्या जागा मिळाल्या. पण शिवसेना आणि भाजपची मोठी पिछेहाट झाली आहे.

एकूण: 65 जागाबहुमतासाठी : 33 जागाराष्ट्रवादी: 30 जागाकाँग्रेस: 23 जागाशिवसेना: 8 जागाभाजप: 2 जागाअपक्ष: 2 जागा

चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांना फटका

तर चंद्रपूरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना फटका बसला आहे. पहिल्यांदाच झालेल्या या महापालिकेच्या निवडणुकीत..काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत, पण बहुमत मिळवता आलं नाही. त्यामुळे भाजपसुद्धा सत्ता मिळवायला प्रयत्न करणार आहे. मुनगंटीवार यांच्या प्रभाग क्रमांक 25 मधून भाजपचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले आहेत. तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपक जैस्वाल यांचा काँग्रेसने पराभव केला.

एकूण: 66 जागाबहुमतासाठी: 34 जागाकाँग्रेस: 26भाजप: 18राष्ट्रवादी: 4शिवसेना: 5मनसे: 1बसपा: 1भारिप: 1अपक्ष: 10

मालेगावात त्रिशंकू अवस्था

तर मालेगाव महापालिकेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली. इथेही काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला. मागच्या वेळी तिसरा महाजला सत्तेवर येण्यासाठी काँग्रेसने मदत केली होती. त्यामुळे आता पुन्हा काँग्रेस आणि तिसरा महाज एकत्र येणार की काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही आघाडी होणार ? शिवसेना विरोधात बसणार की राष्ट्रवादीसोबत जाणार की तिसरा महाजसोबत जाणार? असे अनेक पर्याय मालेगावात खुले आहेत.

एकूण 80 जागाबहुमतासाठी 41 जागाकाँग्रेस 25 जागातिसरा महाज 19 जागाशिवसेना 11 जागाराष्ट्रवादी 8 जागाजनता दल 4 जागामनसे 2 जागाइतर 10 जागा

भिवंडीत त्रिशंकू अवस्था भिवंडी निझामपूर महानगरपालिकेतही त्रिशंकू अवस्था आहे. आणि इथेही काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष असला, तरी महापौर शिवसेना किंवा कोणार्क आघाडीला मिळू शकतं. कोणार्कचे विलास पाटील आपल्या पत्नीला महापौरपद देऊ इच्छितात. समाजवादी पक्षही काँग्रेसपेक्षा कोणार्क किंवा शिवसेनेला मदत करण्याची दाट शक्यता आहे. इथे मनसेला एकही जागा मिळवता आली नाही.

एकूण: 90 जागाबहुमतासाठी: 46 जागाकाँग्रेस: 26 जागाराष्ट्रवादी: 9 जागाशिवसेना: 16 जागा भाजप: 8 जागासपा: 16 जागाकोणार्क: 6 जागाइतर: 9 जागा

close