दिल्ली महापालिकेवर भाजपचा झेंडा

April 17, 2012 1:02 PM0 commentsViews: 4

अमेय तिरोडकर, नवी दिल्ली

17 एप्रिल

दिल्लीमधल्या तीन महापालिकांच्या निवडणुकांचे आज निकाल जाहीर झाले. भाजपने या तिन्ही महापालिका स्पष्ट बहुमताने जिंकल्यात. तर, काँग्रेसला पुन्हा एकदा दिल्लीकरांनी महापालिकेच्या सत्तेपासून रोखलं आहे.

भाजपाचा ओसंडून वाहणारा आनंद कार्यकर्त्यांच्या जल्लोषातून दिसतोय. दिल्लीमधल्या तिन्ही महापालिकांच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. दिल्ली महापालिकेची तीन महापालिकांमध्ये विभागणी झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती.

यात…पूर्व दिल्ली महापालिकेमध्ये एकूण 64 जागा आहेत, त्यापैकी 34 जागा भाजपनं, तर 16 जागा काँग्रेसनं जिंकल्यात उत्तर दिल्ली महापालिकेत एकूण 104 जागा आहेत, त्यात 62 जागा भाजपनं, तर 28 जागा काँग्रेसनं मिळवल्यात तर, दक्षिण दिल्ली महापालिकेमधल्या 104 जागांपैकी 50 जागी भाजप, तर अवघ्या 24 जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला आहे

खरंतर, गेल्या काही काळात दिल्ली चकाचक झालीय. कॉमनवेल्थ गेम्सच्या निमित्ताने मेट्रो आली. फ्लायओव्हर बनले. ट्रॅफीक सुसह्य झालं. एवढ्यावर दिल्ली जिंकता येईल असा काँग्रेसचा अंदाज होता. पण, तो खोटा ठरला. दिल्लीकरांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला महत्त्व दिलं.

दिल्लीतल्या पराभवाची कारणं आता काँग्रेसला शोधावी लागतील. खरंतर, 2009 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दिल्लीमध्ये सगळ्या जागा जिंकता आल्या होत्या. शिवाय, दिल्ली विधानसभेवर तब्बल तेरा वर्षं काँग्रेसचा झेंडा फडकतोय. पण, या मोठ्या निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसचे नेते सामान्य कार्यकर्त्याला ताकद देणं विसरतात. दिल्लीतल्या पराभवानंतर तरी काँग्रेसनेते बदलतील का हा प्रश्नच आहे.

भ्रष्टाचारांच्या अनेक प्रकरणांमुळे अडचणीत आलेल्या काँग्रेसला दिल्लीकरांनी धक्का दिला. पण, देशाच्या राजधानीच्या महापालिकेवर झेंडा फडकवून, देशाची सत्ता मिळवणे भाजपसाठी तितकं सोपं नाही.दिल्लीत भाजपचा झेंडा

पूर्व दिल्ली महापालिका – एकूण जागा 64

भाजप – 34 काँग्रेस – 16

उत्तर दिल्ली महापालिका – एकूण जागा 104

भाजप – 62 काँग्रेस – 28

दक्षिण दिल्ली महापालिका – एकूण जागा – 104

भाजप – 50काँग्रेस – 24

close