म.रे. कोलमडली, प्रवाशांचे अतोनात हाल

April 18, 2012 4:56 PM0 commentsViews: 6

18 एप्रिल

मुंबईकरांना रोज सुख-दुखाची वाटेकरु असलेली 'लाईफ लाईन' आज मुंबईकरांवरच रुसली. काल मध्यरात्री मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकावर असलेल्या सिग्नल पॅनलला रात्री 12 च्या सुमारास आग लागल्याने मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे हा खोळंबा अजून दोन – तीन दिवस राहण्याची शक्यता आहे. रेल्वे सेवा कोलमडल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. प्रत्येक स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झालीय. एका तासाच्या प्रवासासाठी प्रवाशांना तीन-चार तास ताटकाळत राहावे लागत आहे. सर्व मेन-लाईनवर 30-40 मिनिटाने ट्रेन उशीराने धावत आहे. लोकलबरोबरच लांबपल्ल्यांच्या गाड्यांना याचा फटका बसला आहे. लांब पल्ल्याच्या चार गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सध्यातरी काही लांबपल्ल्याच्या गाड्या धावत आहे या गाड्याने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.तर काही प्रवाशांनी बेस्टचा पर्याय निवडला. मात्र अचानक प्रवाशांच्या आलेल्या पुरामुळे बेस्ट खच्चाखच भरुन वाहत आहेत. बसमध्येही गर्दी आणि होत असलेल्या गर्मीमुळे चांगलीच दमछाक झाली.

नेमकं काय घडलं ?

मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानक आणि विद्याविहार स्टेशन दरम्यान सिग्नल पॅनलला रात्री 12 च्यासुमारास आग लागल्यानं मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली. लागलेल्या आगीवर अर्ध्या तासानंतर नियंत्रण मिळालं असलं तरी यामुळे मध्य रेल्वेच्या मेन लाईनच्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला. मेन लाईनच्या ट्रेन 30-40 मिनिटं उशिरानं धावत आहे. हार्बरलाईनवरही याचा मोठ्याप्रमाणावर परिणाम झाला. लांब पल्ल्याच्या चार गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. मुंबईहुन पुणे,मनमाडला जाणार्‍या आणि येणार्‍या लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहे. मात्र आगीचं कारण अजूनही कळू शकलेलं नाही..विद्यार्थ्यांना दिलासा, पेपर पुन्हा होणार

लोकलच्या खोळंब्यामुळे विद्यार्थ्यांना उशीर झाला तर त्यांना पेपर लिहिण्यासाठी पुरेसा वेळ देणार असल्याचे मुंबई विद्यापाठीने जाहीर केलं आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पोहोचताच आलं नाही त्यांचं वर्ष वाया जाऊ देणार नाही, तसेच त्यांची फेरपरीक्षा घेता येईल का याबाबतचा विचार विद्यापीठ करत असल्याचे परीक्षा विभागाचे संचालक सुहास देव यांनी सांगितले आहे. आज संध्याकाळपर्यंत परीक्षा चुकलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी कळल्यानंतर त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असं देव यांनी स्पष्ट केलं आहे.

डब्बेवाल्यांची सेवा बंद

रेल्वेच्या खोळंब्यामुळे आज डब्बेवाल्यांनी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याणपासून सीएसटीपर्यंत डब्बेवाले सेवा पुरवतात. पण रेल्वेच्या खोळंब्यामुळे 30 हजार मुंबईकरांना आज डबे पोचू शकले नाहीत. त्यामुळे आज नोकरदार वर्गावर उपाशी राहण्याची वेळ आलीय.

लोकल ठप्प असल्यानं आज प्रवाशांचे हाल झाले असले तरी उद्या मात्र लोकलची वाहतूक बर्‍यापैकी सुरळीत होईल, असं आश्‍वासन रेल्वे व्यवस्थापनानं दिलं आहे.

उद्या 85% लोकल सेवा वेळापत्रकानुसार चालणारलोकल सेवा 20 ते 25 मिनिटं उशिरा धावणार माहीम ते चर्चगेटदरम्यान पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची मुभाकसार्‍याहून मेल आणि एक्सप्रेसद्वारे प्रवास करण्याची मुभा